पिंपरीतील अपात्र ठेकेदाराला पुण्यात काम देण्याचा घाट, महापालिका जलशुद्धीकरण प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:12 AM2017-10-03T05:12:55+5:302017-10-03T05:13:00+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम असमाधानकारक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चेन्नई येथील व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीला अपात्र ठरवून १० वर्षांसाठी बंदी घातली आहे.
हणमंत पाटील
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम असमाधानकारक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चेन्नई येथील व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीला अपात्र ठरवून १० वर्षांसाठी बंदी घातली आहे. मात्र, याच ठेकेदार कंपनीला पुणे महापालिकेतील काही अधिकाºयांच्या संगनमताने जलशुद्धीकरण केंद्राचे काम देण्याचा घाट घालण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी होणाºया बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
शहरातील मैला शुद्धीकरण केंद्राचे काम पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. महापालिकेच्या चिंचवड, भाटनगर, पिंपळे निलख व कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे कामकाज व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीकडे होते. मात्र, केंद्राचे काम सुरू झाल्यानंतर या ठेकेदाराला महापालिकेने अनेकदा नोटीस व पूर्वसूचना दिली. हजारो रुपयांचा दंड आकारण्यात आला. तरीही कामकाजात सुधारणा झाली
नाही. त्यामुळे आयुक्त श्रावण
हर्डीकर यांच्या आदेशाने या ठेकेदाराला पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुढील १० वर्षे मैलाशुद्धीकरण केंद्राबाबत कोणतीही निविदा सादर करण्याविषयी बंदी घालण्यात आली आहे.
चिंचवड येथील भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्राचे काम २०१४ पासून व्ही. ए. टेक वाबाग कंपनीला देण्यात आले होते. मात्र, केंद्रात वारंवार बिघाड होत असल्याने संबंधित ठेकेदाराला दंड आकारण्यात आला होता. पिंपळे निलख व कासारवाडी (फेज २) येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातही असमाधानकारक काम होते. नोटीस देऊन व दंड आकारूनही काही सुधारणा होत नसल्याने महापालिकेने कंपनीला पुढील कामांसाठी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने पुणे महापालिकेतील मैला शुद्धीकरण केंद्रातील पूर्वीच्या निविदांना मुदतवाढ व नवीन निविदा दाखल करण्यासाठी काही अधिकाºयांना हाताशी धरले आहे.