अखेर दिल्ली भाजपकडून घोषणा, चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीच उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:49 PM2023-02-04T12:49:56+5:302023-02-04T12:50:57+5:30
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले.
पिंपरी: पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक दिनांक 26 फेब्रुवारीला होत असून भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आमदार बंधू शंकर जगताप की पत्नी अश्विनी जगताप? या चर्चेवर पडदा पडला आहे. तर, पुण्यातील कसबा पेठसाठीही भाजपचा उममेदवार जाहीर करण्यात आला आहे. येथून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. या जागेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. दिनाक 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. आमदार यांचे बंधू शंकर जगताप तसेच आमदार पत्नी अश्विनी जगताप या दोघांनीही अर्ज नेले होते. त्यामुळे दोघांपैकी नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी दुपारी उमेदवारी जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे, येथील जागेवर भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.