अखेर संभाजीनगरचा जलतरण तलाव खुला
By Admin | Published: April 9, 2017 04:33 AM2017-04-09T04:33:18+5:302017-04-09T04:33:18+5:30
संभाजीनगर येथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तलावाचे उद्घाटन झाले
पिंपरी : संभाजीनगर येथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तलावाचे उद्घाटन झाले होते. मात्र, काहीतरी सबबी पुढे करून नागरिकांसाठी तलाव खुला करण्यास विलंब केला जात होता. उन्हाळा सुरू झाल्याने तलाव नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागल्याने उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तलाव खुला करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत या घटनेचा निषेध नोंदविला. भाजपा कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
फेब्रुवारी २०१७ ला महापालिका निवडणूक असल्याने राष्ट्रवादी काँगे्रसने २१ डिसेंबर २०१६ ला घाईघाईत तलावाचे उद्घाटन केले होते. उद्घाटनाची घाई केली; मात्र तलाव खुला करण्याच्या हालचाली होत नव्हत्या. निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता गेली. भाजपाने बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. उन्हाळा सुरू झाला असताना, बांधून तयार असलेला तलाव खुला होत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला होता, त्यामुळे भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी तलाव खुला करण्याचे पत्र प्रशासनास दिले होते. प्रशासनाने दखल घेतली जात नसल्याने भाजपाने पुढाकार घेऊन शनिवारी तलाव खुला केला. एकदा उद्घाटन झाले असताना, दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले. (प्रतिनिधी)
कारवाईची मागणी
जलतरण तलावाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केले आहे. तलाव नागरिकांसाठी खुला करण्याची पुढील कार्यवाही महापालिका प्रशासनाची आहे. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही तलाव सुरू केला जात नाही. या दिरंगाईस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी. भाजपाची महापालिकेत सत्ता आहे. त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका मंगला कदम यांनी केली.