अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज?
By प्रकाश गायकर | Published: April 17, 2024 05:44 PM2024-04-17T17:44:50+5:302024-04-17T17:45:32+5:30
आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत नसल्याने पालक हवालदिल झाले होते. अखेर मंगळवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली....
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेशप्रक्रिया अखेर मंगळवारी रात्री सुरू झाली. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ३२२ शाळांची नोंदणी झाली आहे. त्या शाळांमध्ये ८ हजार ५० जागांवर आरटीईतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज भरण्यसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे.
आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत नसल्याने पालक हवालदिल झाले होते. अखेर मंगळवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजता अर्ज भरता येणार होते. मात्र, सुरुवातीला सर्व्हर डाऊन असल्याने अनेक पालकांना अर्ज भरता आले नाही. रात्री उशिरा संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू झाली.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
पालकांनी अर्ज भरताना राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गूगल लोकेशन तपासून बघावे.
एक किमी, १ ते ३ किमी अंतरावर शाळा निवडत असताना दहाच शाळा निवडाव्यात.
एका पालकाने आपल्या बालकासाठी दोन अर्ज भरू नये. तसे आढळल्यास लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही.
अर्ज भरल्यावर पालकांनी अर्जाची प्रत जपून ठेवावी.
दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ४० टक्के आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल.
निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे.
निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयीकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येईल.
आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. पालकांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज भरावेत. अर्ज करताना बिनचूक अर्ज भरण्याची काळजी पालकांनी घ्यायची आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.