पिंपरीतील खळबळजनक प्रकार! महापालिका आयुक्तांच्या नावाने नगरसेवकांकडे मागितली आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 15:44 IST2022-01-23T15:44:12+5:302022-01-23T15:44:58+5:30
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून पैशांची मागणी करण्यात आल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत

पिंपरीतील खळबळजनक प्रकार! महापालिका आयुक्तांच्या नावाने नगरसेवकांकडे मागितली आर्थिक मदत
पिंपरी : सोशल मीडियावरून फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहेत. यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून पैशांची मागणी करण्यात आल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. पिंपरी -चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाचे बनावट व्हाट्स अँप अकाउंट बनवून अनोळखी व्यक्तींनी नगरसेवकांकडे आर्थिक मदतीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका भवन येथे हा प्रकार १७ जानेवारी २०२२ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला.
नीलकंठ धोंडीराम पोमण (वय ५४, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २२) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी पिंपरी -चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश प्रभाकर पाटील यांच्या व्हाट्स प्रोफाइलचा फोटो वापरून खोटे व्हाट्सअप प्रोफाइल बनवले. त्याद्वारे संतोष जाधव यांच्याशी आरोपींनी चॅटिंग केले. नगरसेवक अजित गव्हाणे, अंबरनाथ कांबळे, लक्ष्मण सस्ते यांना आरोपींनी व्हाट्स अप कॉल केला. त्यावर पालिका आयुक्तांचा हुबेहूब आवाज काढून अमेझॉन गिफ्ट कार्डद्वारे आर्थिक मदतीची मागणी केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलचे पोलीस निरीक्षक डाॅ. संजय तुंगार तपास करीत आहेत.
दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने अकाउंट तयार करून पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांचेही बनावट अकाउंट करून त्याद्वारे पैसे मागितले होते. सोशल मीडियावरील संबंधित अकाउंट बंद करण्यात आले होते.