पंक्चरच्या नावाखाली आर्थिक लूट
By admin | Published: March 27, 2016 02:55 AM2016-03-27T02:55:53+5:302016-03-27T02:55:53+5:30
पंक्चर काढणाऱ्यांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट होत आहे. बनावट कंपन्यांच्या ट्यूब ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. त्या ट्यूब कमी कालावधीत खराब होत असल्याने फसवणूक
पिंपरी : पंक्चर काढणाऱ्यांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट होत आहे. बनावट कंपन्यांच्या ट्यूब ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. त्या ट्यूब कमी कालावधीत खराब होत असल्याने फसवणूक झाल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत.
शहरात १२ लाख दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. रस्त्यांवर चौकाचौकांत पंक्चर काढणाऱ्यांनी टपऱ्या थाटल्या आहेत. त्यात सर्वाधिक परप्रांतीय तरुण कारागिरांचा समावेश आहे.
ट्यूब असलेल्या चाकाची पहिली पंक्चर काढण्यासाठी ६० रुपये हा दर पिंपरी-चिंचवड शहर पंक्चर चालक-मालक संघटनेने ठरवून दिलेला आहे. मात्र, अनेक ठिकाणी ७० ते ८० रुपये पहिल्या पंक्चरसाठी घेतले जातात. त्या पुढच्या प्रत्येक पंक्चरला ६० रुपये घेतले जात आहेत. कामाला जाणाऱ्या किंवा विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहनचालक घाईत असतो. अशा वेळी पंक्चर काढणे महत्त्वाचे असते. याच गोष्टीचा फायदा घेत पंक्चर काढणारे कारागीर त्यांची आर्थिक लूट करतात. मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत.
फिटिंग करणे, वॉल रिपेअरिंग, पॅच मारणे, जादाच्या पंक्चर काढणे या सर्वांचे दर संघटनेने ठरवून दिले आहेत. मात्र सगळ्याच कामांमध्ये पंक्चर काढणाऱ्यांकडून लूट केली जात आहे. ट्यूबलेस टायरला पहिली पंक्चर काढण्यासाठी ८० रुपये दर संघटनेने निश्चित केला आहे. यासाठीही १०० रुपये आकारण्यात येतात.
एकपेक्षा जास्त पंक्चर असल्यास कारागिराकडून ट्यूब बदलण्याचा आग्रह केला जातो. पॅच मारण्यासाठी फिटिंगचे वेगळे दर आकारण्यात येतात. ट्यूबच्या व्हॉल्व्हजवळ पंक्चर असल्यास तो खराब आहे, बदलावा लागेल असेही कारागीर सांगतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाकडून एकूण बिल कसे जास्तीत जास्त वाढविता येईल, याचा पूर्ण प्रयत्न दुकानदारांकडून केला जातो.
(प्रतिनिधी)
शोधताना केल्या जातात अनेक पंक्चर
पंक्चर शोधण्यासाठी ट्यूबमध्ये हवा भरून ते पाण्यात टाकून तपासले जाते. या वेळेत हातचलाखी करून ट्यूबला अनेक छिद्र पाडली जातात. एकाऐवजी असंख्य पंक्चर असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंक्चर काढण्याचा खर्च दुप्पट ते तिपटीने वाढतो. पंक्चर काढण्याऐवजी नवीन ट्यूब बसविण्याचा आग्रह केला जातो. घाईत असल्याने वाहनचालकही नवीन ट्यूब घालण्यास नाइलाजास्तव संमती देतात. पंक्चर काढणाऱ्या कारागिरांची हातचलाखी आर्थिक कमाईचे साधन झाले आहे. मात्र, किरकाळे बाब असल्याने पोलिसांकडे तक्रार केली जात नाही.