बनावट कागदपत्रप्रकरणी भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:56 AM2017-10-28T00:56:30+5:302017-10-28T00:56:41+5:30
पिंपरी : महापालिका निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात शिक्षणविषयक खोटी माहिती दिली.
पिंपरी : महापालिका निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात शिक्षणविषयक खोटी माहिती दिली. अकरावी अनुत्तीर्ण असताना बनावट दाखला तयार करून महाविद्यालयाची फसवणूक केली. हीच कागदपत्रे आणि माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रभाग २६चे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी फिर्याद दिली आहे. ‘‘महापालिका निवडणुकीत तुषार कामठे यांनी खरी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे गरजेचे होते. खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कामठे यांनी दिलेल्या शिक्षणाबद्दल शंका आल्याने माहितीच्या अधिकाराचा आधार घेतला. माहिती मिळविली. कामठे यांनी पुण्यातील मराठवाडा मंडळाचे ज्युनियर कॉलेज आॅफ कॉमर्स महाविद्यालयात १९९८ मध्ये अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला होता. त्या वर्षी ते नापास झाले होते. महाविद्यालयाकडून एफवायजेसी नापास असा शेरा मारला होता. त्यानंतर मार्च १९९९ मध्ये त्यांनी सांगवीतील बाबूराव घोलप महाविद्यालयात कॉमर्सकरिता प्रवेश घेतल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी देण्यात आलेल्या दाखल्यावर एफवायजेसी उत्तीर्ण असा शेरा असल्याचे दिसून आले.
>सचिन साठेंनी केलेली तक्रार खोटी आहे. मी कोणतीही शिक्षणाची खोटी माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. माझे शिक्षण झाले आहे ती कागदपत्रे निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेली आहेत. त्यामुळे सचिन साठे यांना महापालिकेच्या निवडणुकीत पराभवामुळे नैराश्य आले आहे आणि त्यामुळे ते माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत.
- तुषार कामठे, नगरसेवक