हिंजवडीत कंपनीला लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; दहा तासानंतर आग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:30 PM2020-02-18T16:30:32+5:302020-02-18T16:41:07+5:30
कोट्यवधींचे नुकसान, आगीचे कारण गुलदस्त्यात.एकजण जखमी
हिंजवडी : स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरी हिंजवडीतील टप्पा दोनमधील व्हेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनीस पहाटे सव्वातीनच्या सुमारास लागलेल्या आगीत कोट्यंवधींचे नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे. आग दहा तासात आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आले असले तरी कंपनीतील काही भागात सुमारे बारा तास आग धुमसत होती. आगीचे कारण समजू शकले नाही. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञाननगरीतील टप्पा क्रमांक दोन मध्ये माण गावातील सर्व्हे क्रमांक २७९ मध्ये हेरॉक लायटिंग सिस्टिम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीत प्रवाशी कार आणि दुचाकी वाहनांसाठी दिवे तयार करण्याचे काम केले जाते. उत्पादन, विक्री आणि संशोधन अशा तीन पातळ्यांवर या ठिकाणी का सुरू असते. हेड लॅम्प, रिअर लॅम्प, फ्रंट फॉग लॅम्प, एलईडी हेड लॅम्पची निर्मिती केली जाते. तसेच कंपनीची प्रयोग शाळाही या ठिकाणी आहे.
कंपनीत तिसरी शिफ्ट सुरू असताना पहाटे सव्वा तीनच्या सुमारास आग लागली. त्यावेळी साडेचारशे कामगार कामावर होते. अचानकपणे लागलेल्या आगीमुळे सर्व कामगारांची धावपळ झाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांने हिंजवडी पोलिस आणि अग्निशामक दलास दूरध्वनी करून आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक पंधरा मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने आग विझविण्यास सुरूवात केली. आगीचे लोळ एवढे होते की आग विझविण्यात अडथळे येत होते. त्यानंतर पीएमआरडीएचे अग्निशमन दल, एमआयडीसी आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील अग्निशामक दलांची मदत घेण्यात आली. १२ अग्निशमन वाहने व २० पाण्याचे टँकरद्वारे आग विझविण्यात आली.
कोट्यवधींचे नुकसान
दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इलेक्ट्रिक सुटे भाग कंपनीत तयार करण्यात येत होते. प्लास्टिक, रबर मटेरिअल असल्याने आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले, काही वेळातच आग संपूर्ण कंपनीत पसरल्याने कंपनीतील मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, याबाबत पोलीसात तक्रार दाखल झाली नसल्याने नुकसान नक्की किती झाले. याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच आगीचे कारणही समजू शकले नाही.
........................................
पहाटे तीनच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. आगीने रौद्ररुप धारण केले होते, स्थानिक अग्निशमन दल आणि इतर ठिकाणच्या दहा अग्निशमन गाड्या तसेच खासगी टँकरने मंगळवारी दुपारी उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग पूर्ण विझल्यानंतरच पंचनामा केला जाईल. नुकसान नक्की किती झाले आणि आगीचे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही. चौकशी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले.
-यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी.