PCMC: नगरमध्ये आगीची घटना घडूनही शहरातील ६२ रुग्णालयांचे फायर ऑडिटबाबत कानावर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 11:48 AM2021-11-17T11:48:15+5:302021-11-17T12:20:29+5:30
राज्यात मागील काही दिवसांमध्ये शासकीय रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
तेजस टवलारकर
पिंपरी:पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात एकूण ४७३ रुग्णालये आहेत. त्यापैकी २६६ रुग्णालयांनी खासगी एजन्सीमार्फत फायर ऑडिट करून घेतले आहे. तर ५३ रुग्णालयांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून फायर ऑडिट करून घेतले आहे. अग्निशामक दलाने केलेल्या ऑडिटमध्ये महापालिका रुग्णालयांचा आणि दवाखान्यांचा समावेश आहे, असे एकूण शहरातील ३१९ रुग्णालयांनी फायर ऑडिट झाले आहे. परंतु शहरातील ६२ रुग्णालयांनी फायर ऑडिट करण्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आणि ऑडिट केले नसल्याची स्थिती आहे. अशा रुग्णालयांवर महापालिका प्रशासन काय कारवाई करणे अपेक्षित आहे.
राज्यात मागील काही दिवसांमध्ये शासकीय रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. काही ठिकाणी आयसीयू कक्षात आगीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी सर्व रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घ्यावे, अशा सूचना राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेता रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. फायर ऑडिटसाठी शहरात ३२ खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती.
३४ रुग्णालयांचा अहवाल येणे बाकी-
शहरातील ३४ रुग्णालयांचा फायर ऑडिटचा अहवाल अद्याप अग्निशामक दलाला प्राप्त झालेला नाही. या रुग्णालयाचा अहवाल आगामी काही दिवसांत प्राप्त होईल, असे अग्निशामक दलाने सांगितले.
५७ रुग्णालये बंद-
शहर आणि परिसरात ४७३ रुग्णालये आहेत. त्यापैकी ५७ रुग्णालये बंद झालेले आहे. तसेच काही रुग्णालयांचे स्थालांतर झाले आहे. ज्या इमारतीत रुग्णालय आहे, फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी त्या इमारतीच्या प्रमुखांची देखील आहे.
शहरातील एकूण रुग्णालये : ४७३
खासगी एजन्सीमार्फत ऑडिट केलेले : २६६
अग्निशामक दलाकडून फायर ऑडिट करून घेतलेले : ५३
बंद स्थितीत आढळलेले : ५७
अहवाल येणे बाकी : ३४
फायर ऑडिटला नकार दिलेले रुग्णालय : ६२
शहरातील रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थिती कशा हाताळायची याचे प्रशिक्षण अग्निशामक विभागाकडून घ्यावे. ऑडिटमधील त्रुटी देखील दूर कराव्यात.
- किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी