कुदळवाडीत प्लास्टिक गोदामाला आग, २० घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 05:48 PM2019-06-05T17:48:42+5:302019-06-05T17:50:22+5:30
कुदळवाडी येथील विसावा चौकातील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली.
पिंपरी : कुदळवाडी येथील विसावा चौकातील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गोदामाशेजारील सुमारे २० घरेही यात खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडीतील विसावा चौकात असलेल्या प्लास्टिक गोदामाला बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. गोदामात प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग पसरत गेल्याने गोदामा शेजारी असलेली काही दुकाने आणि सुमारे २० घरांनाही आग लागली. अग्निशामक दलाने सतर्कता दाखवत या घरातील सुमारे शंभर जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलातर्फे कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी खासगी टँकरसह अग्निशामक दलाच्या १२ बंबांचा त्यासाठी वापर करण्यात आला. सकाळी सात वाजता आग आटोक्यात आली. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे किरण गावडे, ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, नामदेव शिंगाडे, सूर्यकांत मठपती यांच्यासह महापालिकेच्या पाच अग्निशामक केंद्रांतील ४० कर्मचाºयांनी परीश्रम घेतले.