चिंचवडमधील केशवनगरात भंगाराच्या दुकानाला आग; भंगाराच्या पिशव्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:02 PM2017-11-27T18:02:15+5:302017-11-27T18:09:35+5:30
चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात एका भंगाराच्या दुकानाला आज साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली.
चिंचवड : चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात एका भंगाराच्या दुकानाला आज साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या ३ अग्निशामक गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.
या ठिकाणी भंगारमालाच्या पिशव्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर अनेक मातीची भांडी जळाली आहेत. अत्यंत वर्दळीच्या असणा?्या या रस्त्यावर आगीचा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. भंगारमालाच्या या दुकानात प्लॅस्टिक पिशव्यांचे ढीग लागले होते. या पिशव्यांनी अचानक पेट घेतल्याने आग पसरल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
या भागात अनेक अनधिकृत व्यवसाय थाटण्यात आले आहेत. नदीपात्रालगत असणारा हा परिसर आहे. या भागात पूररेषा असल्याने बांधकामे होऊ शकत नाहीत. या मुळे येथील मोकळ्या जागेत अनेक अनधिकृत व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. महापालिकेचा अनागोंदी कारभार या व्यवसायांना खतपाणी घालत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. या भागात अनधिकृत व्यावसाय वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पालीका प्रशासन व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
अनधिकृत व्यवसायाबाबत चिंता
आगीची घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीची घटना घडूनही या ठिकाणी कोणतेही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी आले नाहीत. अशा वाढत असलेल्या अनधिकृत व्यवसायाबाबत परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.