महामार्गालगतच्या दुकानांना आग; लाखोंचे साहित्य खाक
By नारायण बडगुजर | Published: May 23, 2024 09:44 PM2024-05-23T21:44:05+5:302024-05-23T21:44:15+5:30
गर्दी अन् वाहनांचा खोळंबा
पिंपरी : बंगळुरू - मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील गॅरेज आणि फर्निचरच्या एका दुकानाला आग लागली. यात दुकानातील तसेच गॅरेजमधील साहित्य खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले. फर्निचर दुकानातील लाकडी साहित्य तसेच गॅरेजमधील भंगार साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ आणि धुराचे लोट निघत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट होती. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथे मेट्रो पुलाच्या खाली गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बालेवाडी क्रीडा संकुलाकडून वाकड पुलाच्या दिशेने जाताना महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत मेट्रो पुलाजवळ आशिष मोटर्स आणि एस. आर. हँडीक्राफ्ट अँड फनिर्चर ही दोन दुकाने आहेत. या दोन दुकानांमधून गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अचानक मोठा धूर आणि आगीचे लोळ निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अग्निशामक दलाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार अग्निशाकम दलाच्या जवानांनी आणि हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अग्निशामक विभागाच्या मारुंजी केंद्राचे दोन, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक केंद्राचे तीन, एमआयडीसीचा एक, तसेच पुणे महापालिकेचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीच्या या घटनेत दोन्ही दुकानांतील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. यात कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवित हानी झाली नाही. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आला आहे.
गर्दी अन् वाहनांचा खोळंबा
महामार्गालगतच्या दुकानांना आग लागल्याने सेवा रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली. सेवा रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. तसेच महामार्गावरील वाहतूक देखील संथ झाली होती. त्यामुळे वाहनांचा खोळंबा झाला होता. वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.