भूमिगत गॅस पाईपलाईनला रहाटणीत आग; खड्डा न बुजविल्याने घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:40 IST2018-01-27T13:38:47+5:302018-01-27T13:40:53+5:30
मनमंदिर सोसायटी समोरील रस्त्यावर भूमिगत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली, यात कोणत्याही प्रकारची आर्थिक व इतर हानी झाली नाही.

भूमिगत गॅस पाईपलाईनला रहाटणीत आग; खड्डा न बुजविल्याने घडला प्रकार
रहाटणी : येथील मनमंदिर सोसायटी समोरील रस्त्यावर भूमिगत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली, यात कोणत्याही प्रकारची आर्थिक व इतर हानी झाली नाही. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर पालिकेच्या राहाटणी येथील अग्निशामक दलास आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले.
नागरिकांना कमी खर्चात व कायमस्वरूपी गॅस मिळावा म्हणून शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने भूमी अंतर्गत पाईपलाईन टाकली आहे. अशीच पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापूर्वी खोदण्यात आले होते. तो खड्डा अद्याप बुजविण्यात आले नव्हते. येथील नागरिकांनी कंपनीच्या संबधित अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती मात्र याकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम पाहण्यास मिळाला असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. अचानक मोठा आवाज व आगीचे लोळ पाहून नागरिक भयभीत झाले काही नागरीकांनी तत्काळ राहाटणी येथील पालिकेच्या अग्निशमन दल व पोलिसांना खबर कळविली त्यानंतर अग्निशमन दलाने तब्बल दीड तास पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. पाण्याच्या माऱ्याने शांत झालेली आगीने पुन्हा एखादा भडका घेतला व पुन्हा एखादा साऱ्यांची पळापळ सुरू झाली.
महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या कर्मचायार्नी गॅस पाईपचा कॉक बँड केल्यानंतरही अर्धा तास गॅसचा दाब सुरूच होता, मात्र सकाळी सातच्या सुमारास आग आटोक्यात आली.