PCMC: आगीवर लगेच मिळणार नियंत्रण! रावेतला अग्निशमन केंद्र; पालिका करणार ३० कोटींचा खर्च
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: December 27, 2023 05:08 PM2023-12-27T17:08:29+5:302023-12-27T17:09:32+5:30
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे...
पिंपरी : वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे मोशी भागासाठी उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्रानंतर आता रावेत येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ३० कोटी खर्च येणार आहे. त्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. २६) स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. प्रभाग क्रमांक १६ येथे हे केंद्र उभारण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. उद्योग, व्यवसाय आणि नोकरीसाठी तरुणांचा शहराकडे ओढा असल्यामुळे लगतच्या ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होत आहे. रावेत भागात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निगडी, रहाटणी अग्निशमन केंद्रांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे महापालिका या भागासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात आणखी १० अग्निशमन केंद्रांची गरज-
महापालिकेचा अग्निशमन विभाग अत्यावश्यक सेवेंतर्गत येतो. शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने औद्योगिक, आयटी कंपन्या आहेत. नियमाप्रमाणे शहराच्या लोकसंख्येनुसार सद्य:स्थितीत शहरात १८ अग्निशमन केंद्रे गरजेची आहेत. मात्र, केवळ आठ केंद्रे आहेत. त्यामुळे आणखी दहा केंद्रे उभारण्याची गरज आहे.
सहा फायर फायटर दुचाकी-
महापालिकेच्या वतीने अग्निशमन विभागाच्या ताफ्यामध्ये जून २०२२ पासून सहा अग्निशमन मोटारसायकलींचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग शहरातील अरुंद रस्ते, गल्लीमधील आगी, मार्केट परिसर अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या गाडीमध्ये घटनास्थळी ४० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. सोबत प्रथमोपचार पेटी, अग्निशमन वायू, ध्वनिक्षेपक यंत्र असे साहित्य आहे.
शहरातील अग्निशमन यंत्रणा सद्य:स्थिती...
शहरातील केंद्रे : ०८
एकूण बंब : २२
दुचाकी गाड्या : ०६
रावेत-किवळे, पुनावळे भागात हाऊसिंग सोसायट्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बीआरटीच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यावरही अनेक मोठमोठी दुकाने सुरू झाली आहेत. पुढे पवना नदीपात्रालगत शेतीचा परिसर आहे. यामुळे परिसरात दुर्घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणेला पोहोचायला वेळ लागतो. त्यासाठी महापालिका रावेत भागात अग्निशमन केंद्र उभारणार आहे.
- मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका