फटाके व्यावसायिक झाले निराधार , न्यायालयाच्या निर्णयाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:54 AM2017-10-17T02:54:11+5:302017-10-17T02:54:20+5:30
दिवाळीचा उत्साह सगळीकडे ऊतू जाऊ लागला असताना शहरातील नव्याजुन्या फटाका व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करू नये, असा निर्णय घेतला.
पिंपरी : दिवाळीचा उत्साह सगळीकडे ऊतू जाऊ लागला असताना शहरातील नव्याजुन्या फटाका व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करू नये, असा निर्णय घेतला. त्या निर्णयाचा फटका त्यांना बसला असून त्यामुळे अनेकांना दर वर्षी फटाका विक्रीतून होणा-या नफ्यावर पाणी सोडावे लागले आहे. एकूण ३५० फटाके विक्रेत्यांनी महापालिकेकडे परवानगी मागितली होती, त्यातील अवघ्या १५० जणांना परवानगी मिळाली आहे.
फटाके हा दिवाळीचा अविभाज्य घटक आहे, त्यातही लहान मुलांसाठी तर फटाके म्हणजे दिवाळीच. मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या प्रदूषणामुळे फटाक्यांचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी फटाक्यांच्या विरोधात जागृती मोहीमच सुरू केली आहे. त्यातच काही जणांनी थेट न्यायालयातच याचिका दाखल केल्यामुळे हा सिझनल व्यवसायच आता धोक्यात आला आहे. एका याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने निवासी इमारतीमध्ये फटाके विक्री नाही असे आदेश दिले आहेत. महापालिका व अन्य सर्व सरकारी यंत्रणा यावर बोट ठेवत फटाके विक्रेत्यांना परवाननी नाकारली आहे.
अनेक विक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहेत. सणस मैदानात पूर्वी फटाक्यांची बाजारपेठ असायची. महापालिका त्यासाठी स्टॉल देत असे. ती जागा देणे बंद झाल्यापासून फटाके विक्रेत्यांना चांगली जागाच मिळालेली नाही. त्यातच गेल्या काही वर्षात उपनगरांचा विकास झपाट्याने झाला. त्यामुळे तिथेही व्यवसाय सुरू झाला. शहराच्या मध्यवस्तीतील फटाके मार्केट मोडले ते मोडलेच, पुन्हा काही ते उभे राहिलेले नाही. काही व्यावसायिक आपल्याच दुकानात माल ठेवून फटाके विक्री करीत असत, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दिवाळीसाठी म्हणून पूर्वीच मागवलेला त्यांचा सर्व माल पडून आहे.
काही व्यावसायिकांनी महापालिका पदाधिकाºयांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्यानुसार निवासी इमारतीमधील स्वत:च्या दुकानामधून फटाके विक्री करणाºयांनी त्या इमारतीमधील वरच्या मजल्यावर असणाºया सर्वांना फटाके विक्री सुरू आहे तोपर्यंत दुसरीकडे राहायला नेणार असे प्रतिज्ञापत्रक लिहून द्यायचे आहे. असे करण्यास कोणीही तयार नाही.
काही जणांनी एकत्र येत यावर मार्ग काढला आहे. खडकी येथे एका मैदानात काहींनी दुकाने थाटली आहेत. शहरात रस्त्याच्या कडेला, खाद्यपदार्थाच्या स्टॉलसमोरच्या जागेत काही दुकाने सुरू झाली आहेत. उपनगरांमध्येही याच पद्धतीने काही जणांनी एकत्र येऊन एखाद्या मैदानात मार्केट सुरू केले आहे. मैदानात दुकान असेल तर लगेचच परवानगी मिळत असल्याने अशी लहान लहान मार्केट आता ठिकठिकाणी सुरू झालेली दिसत आहेत, मात्र यातही धोका आहेच. जास्त दुकाने असली, की तिथे अग्निशमन दलाची गाडी किंवा आग विझवण्यासाठीची काही तरी साधने असणे गरजेचे आहे. ती असल्याशिवाय अशा मार्केटला परवानगी देऊ नये असा नियम आहे, मात्र तो बाजूला ठेवून अशी मार्केट सुरू झाली आहेत.
वर्षभर सुरू असलेल्या दुकानांचे काय?
फटाक्यांची काही दुकाने बाराही महिने सुरू असतात. त्यातील बहुतेक दुकाने निवासी इमारतींमध्ये आहेत. तरीही ती सुरू आहेत, याकडे महापालिका अधिका-यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी त्यांची परवानगी जुनी असल्याचे सांगितले.
या दुकानांमधून मोठमोठे फटाके विकले जातात, त्यांना परवानगी व साधे फटाके व तेसुद्धा फक्त दिवाळीपर्यंतच विकणाºयांना मात्र मनाई ही विसंगती असल्याची टीका फटाके विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.