फटाके विक्रेत्यांचे निघाले दिवाळे, यंदा 30 टक्क्यांनी विक्री कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 01:48 AM2018-11-11T01:48:31+5:302018-11-11T01:49:24+5:30
न्यायालयाचा आदेश : अर्थकारणावर परिणाम
पिंपरी : दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे भर दिला जातो. मात्र, आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध आणल्याने यंदा फारशे फटाके वाजलेच नाहीत, असा अनुभव आला. त्यामुळे मागणी कमी असल्याने फटाक्यांची विक्री तीस टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी फटाके विक्रेत्यांवर संक्रांत आल्याचे दिसून आले.
दीपोत्सव जसा आकाशकंदील, पणत्या, दीव्यांचा, गोड पदार्थांचा आहे, त्याचप्रमाणे आतषबाजीचाही सण आहे. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण फटाके वाजविण्याचा आनंद लुटतात. दिवाळीपूर्वी पंधरा दिवस अगोदरच बाजारपेठेत फटाके उपलब्ध असतात. फटाक्यांचे विविध प्रकार दाखल होत असतात. दरवर्षी फटाक्यांची मागणी ही वाढतच असते. मात्र दरवेळी प्रमाणे यावर्षीही पिंपरीतील अनेक फटाका व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके मागवले होते. फटाक्यांची विक्रीच कमी झाल्यामुळे फटाके व्यापाºयांमध्ये चिंता आहे.
न्यायालयाची भीती
रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवता येतील, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे फटाके वाजविण्यावर निर्बंध आले होते. याबाबत मुंबईत गुन्हेही दाखल झाले होते. न्यायालयाची भीती नागरिकांना होती. तसेच शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय यांच्याकडून वेळोवेळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी महापालिकेने जनजागृती केली होती. त्यामुळे नागरिकांनी फटाके खरेदी न करण्यावर भर दिला.
महागाईचा फटका
औद्योगिक मंदीचा परिणामही फटका विक्रीवर दिसून आला. कपडे, मिठाई, आकाशकंदील, पणत्या, फराळाचे साहित्य खरेदी केल्यावर फटाके खरेदी करण्यासाठी पैसेच उरले नाहीत, असे अनेकांनी सांगितले. अनेकांनी फटाके खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. व्यावसायिकांची कोंडी झाल्याने यंदाच्या दिवाळीमध्ये तोंडचे पाणी पळाल्याचे दिसून आले. मोठा आवाज करणाºया फटाक्यांची मागणी सुरुवातीपासूनच कमी होती. दरवर्षीपेक्षा या वेळी ३०-३५ टक्के फटाके विक्री कमी झाली आहे.
दिवाळीत फटाके खरेदी करण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. मात्र, यंदा ग्राहकांची संख्या कमी होती. त्याची कारणे अनेक आहेत. परिणामी फटाके पडून आहेत. विकत घेतलेला फटाक्यांचे काय करायचे हा प्रश्न आहे़ यंदा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- विक्रांत शर्मा, फटाके व्यापारी