गोळीबार प्रकरणाचा उलगडा; आरोपीकडून पिस्तूल, काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:09 AM2018-03-24T04:09:20+5:302018-03-24T04:09:20+5:30
चिंचवड येथील गोळीबाराच्या घटनेचा उलगडा झाला असून, पोलीस तपासात आरोपी हाती लागले आहेत. गोळीची जखम असताना, घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची फिर्याद दाखल करण्यास जखमी टाळाटाळ करीत होता.
पिंपरी : चिंचवड येथील गोळीबाराच्या घटनेचा उलगडा झाला असून, पोलीस तपासात आरोपी हाती लागले आहेत. गोळीची जखम असताना, घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची फिर्याद दाखल करण्यास जखमी टाळाटाळ करीत होता. मात्र पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली. जखमी इसमावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने जखम पिस्तुलाच्या गोळीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली. एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, अशी माहिती परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्चला वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रात्री गोळीबार झाला. या घटनेतील आरोपी दौला नदाफ (वय २७, पिंपळे गुरव), अजमत शेख (वय २८, रा. वेताळनगर), सद्दाम शौकत अली नदाफ (वय २७, रा. बिजलीनगर), शिवाजी तानाजी सोनलकर (वय २१, मोरयानगर) यांना अटक करण्यात आली आहे. जखमी कोळपे याला पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.
या गोळीबारात जयवंत चितळकर जखमी झाला. चितळकर याच्याबरोबर असलेला नीलेश कोळपेही जखमी झाला. याप्रकरणी चिंचवडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व सहकारी माहिती घेण्यासाठी गेले. जखमी चितळकर विसंगत माहिती देऊ लागला. तसेच फिर्याद देण्यासही नकार देऊ लागला. पोलीस कर्मचारी सुरेखा सगर यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. मकरंद वाल्हेकर आणि नीलेश कोळपे यांच्याबरोबर मद्य पिऊन जात असताना, तोल जाऊन पडल्याने लोखंडी सळई लागून जखम झाल्याचा बनाव चितळकर याने केला होता.
मात्र, घटनेच्या तपासासाठी खोलात जाण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. चितळकर याच्यावर उपचार करणारे डॉक्टर अमोल पाटील यांनी, जखम पिस्तुलाच्या गोळीची असल्याचा अहवाल त्यांनी दिला.
सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजचा आधार
घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासले असता, चार ते पाच जणांमध्ये मारहाण झाल्याचे दिसून आले. मात्र चेहरे अस्पष्ट दिसत होते. फेसबुकच्या माध्यमातून छायाचित्रे जुळवून पाहिली. ती छायाचित्रे जखमीला दाखवली, तरीही त्यांना ओळखत नसल्याचे जखमीने सांगितले. पिंपळे गुरव भागात शोध घेऊन एका संशयितास ताब्यात घेतले. दौला जबार नदाफ याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, दारू पिऊन चितळकर व त्याच्या साथीदारांनी आपले मामा अजमत शेख यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली.
याबाबत मामाने मला कळविले. त्या वेळी वेताळनगर परिसरातच असल्याने तीन मित्रांना घेऊन शिवाजी चौकाजवळ गेलो आणि मामाला का मारले याचा जाब विचारला. त्या वेळी एकाने पिस्तूल उगारले. सद्दाम नदाफ याने ते हिसकावले, मात्र त्या वेळी चुकून गोळी सुटून ती चितळकरच्या दंडाला चाटून गेली. पिस्तूल खाली पडले. पिस्तूल घेऊन तेथून ते पसार झाले.