उरुळीकांचन येथे व्यापाऱ्यावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:31 PM2018-11-13T23:31:09+5:302018-11-13T23:32:04+5:30
गावठी पिस्तुलाचा वापर : दुचाकीवरून दोघा जणांनी केला हल्ला
उरुळीकांचन : उरुळीकांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकातील महात्मा गांधी विद्यालय रस्तावरील प्रसिद्ध वापारीमल सावलदास या होलसेल कपडे विक्रेत्याच्या दुकानावर मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ६ च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला आहे. दुकानावर दर्शनी भागावर झालेल्या गोळीबारात दुकानासमोर मांडलेल्या शोभेच्या पुतळ्याला भेदून गोळी आरपार गेली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून मुख्य गावातील नारायण मोबाईल शॉपी दुकानासमोरही गावठी कट्ट्यातून आणखी एक गोळी झाडून हल्लेखोर पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.
उरुळीकांचनमधील महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावर वापारीमल सावलदास हे प्रसिद्ध होलसेल कपडे विक्रेते दालन आहे. इंदरशेठ वापारीमल दर्डा यांच्या मालकीच्या या कपडा दालनात मंगळवारी नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. दालनात सायंकाळी ६ च्या सुमारास दुचाकीवरून सोलापूर महामार्गावरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरून गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यानंतर आरोपी दुचाकीवरून महात्मा गांधी विद्यालय रस्तामार्गे पसार झाले. या हल्ल्यावेळी दालनात कॅश काऊंटरवर दोन महिला कर्मचारी काम करीत होत्या. त्यांच्यासमोरील शोभेच्या पुतळ्यावर गोळी आरपार झाल्याची आढळून आली आहे. हल्लेखोरांनी या रस्त्यावरूनच पुढे जाऊन मुख्य गावात नारायण मोबाईल शॉपी या दुकानासमोर हवेत गोळीबार केला. हल्लेखोर २० ते २५ वर्षे वयोगटातील असून एकाने लाल रंगाचा शर्ट, तर दुसºयाने काळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
या हल्ल्याचा प्रकार घडताच लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून हल्लेखोरांंची माहिती काढण्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उरुळीकांचनमधील प्रसिद्ध व्यापाºयांवरखंडणीसाठी दहशत माजविण्याच्या दृष्टीने हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे.