पिंपरीत गोळीबार; महिला बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:17 AM2018-06-10T02:17:02+5:302018-06-10T02:17:02+5:30
एच़ ए़ कंपनी वसाहतीत एका महिलेवर गोळीबार झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास एच. ए. शाळेजवळ घडली. महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.
पिंपरी - एच़ ए़ कंपनी वसाहतीत एका महिलेवर गोळीबार झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास एच. ए. शाळेजवळ घडली. महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या बाजूने गेल्या. शीतल फिलिप सिकंदर (वय ३५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे त्या महिलेचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अॅड. सुशील मंचरकर यांच्या विरोधात यापूर्वी महिलेने एका प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविलेली आहे. त्या कारणावरुन मंचरकर फिर्यादी महिलेला नेहमी धमकावत असे. यातूनच हा हल्ला झाला असल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
मुलगा दहावीच्या परीक्षेत पास झाला, म्हणून एच़ ए़ स्कूल जवळ असलेल्या मिठाईच्या दुकानातून पेढे आणण्यासाठी ही महिला मैत्रिणीबरोबर गेली. एकच्या सुमारास पेढे घेऊन पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. आरोपीचा नेम चुकल्याने गोळ्या बाजूने गेल्या. महिलेला इजा पोहोचली नाही. येथे मोठ्याने आरडाओरडा सुरू झाला. पकडले जाण्याची शक्यता लक्षात येताच दोन्ही आरोपींनी दुचाकीवरून तेथून पलायन केले. बेशुद्धावस्थेतील महिलेला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी कोणावर संशय आहे, का याबद्दल विचारणा केली. घटना कशामुळे घडली. याची माहिती घेतली. त्या वेळी महिलेने जुन्या एका प्रकरणाचा संदर्भ देत गोळीबाराच्या घटनेत मंचरकर यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.