पहिला दिवस अर्जाविना
By admin | Published: February 2, 2017 03:51 AM2017-02-02T03:51:11+5:302017-02-02T03:51:11+5:30
वडगाव मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.
वडगाव मावळ : वडगाव मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.
तहसील कार्यालयाकडे इच्छुक उमेदवार फिरकलेच नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तहसील कार्यालयाच्या आवारात इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांविषयी माहिती घेण्यासाठी व जुळवाजुळव करण्यासाठी तुरळक गर्दी झाली होती. पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेबुवारीला होत असून, उमेदवारी भरण्याचा बुधवारी पहिला दिवस होता.
तालुक्यात सर्वच पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे उमेदवारी अर्जदेखील पुढील दोन-तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात भरले जाण्याची शक्यता आहे. सध्या कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे तिकीटवाटप न झाल्यामुळे कोणीही अर्ज भरला नाही.
उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम भरल्याची पावती अथवा चलन, संगणकीकृत नामनिर्देशन पत्रातील सर्व रकाने भरलेली स्वाक्षरी केलेली मूळप्रत, साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्रे, घोषणापत्रे , मालमतेविषयी प्रतिज्ञापत्र, २१ वर्षपूर्ण झाल्याचा पुरावा, मतदार यादीतील नोंदीची प्रमाणित प्रत, राखीव जागेसाठी सक्षम अधिकाऱ्याची जातीच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, जात पडताळणी प्रमाणपत्र, अथवा पडताळणीसाठी सादर प्रस्तावाची पोच व राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवत असल्यास जोडपत्र १ व २ आदी कागदपत्रे जोडणे उमेदवाराला आवश्यक आहे. तहसील कार्यालयाला बुधवारी निवडणूक निरीक्षक धनवडे यांनी भेट दिली. निवडणूक अधिकारी मावळचे प्रांत सुभाष बागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे उपस्थित होते (वार्ताहर)
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांचा आपल्या मतदारसंघाचे व्हीजन काय असेल, असा एक मिनिट व्हिडीओ तयार करून संकेतस्थळावर टाकण्यात येणार होता. परंतु प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये उमेदवारांची संख्या हजारांच्या घरात जात असून, यासाठी येणारा खर्च कोण करणार, याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. यामुळे येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे :
१ ते ६ फेबु्रवारी सकाळी ११
उमेदवारी अर्जांची छाननी : ७ फेबु्रवारी
उमेदवारी अर्ज मागे घेणे अंतिम तारीख :
१३ फेबु्रवारी
मतदान : २१ फेबु्रवारी सकाळी ७.३० ते ५.३०
मतमोजणी : २३ फेबु्रवारी सकाळी १० वाजल्यापासून
सोशल मीडियावर खास वॉच
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार अथवा समर्थकांकडून प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून फेसबुक, व्हॉट्सअॅप व अन्य सर्व सोशल मीडियावर खास वॉच ठेवण्यात येणार आहे.