गुन्ह्यांपासून तरुणांना परावृत्त करण्यास प्राधान्य : संदीप बिष्णोई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:57 PM2019-09-30T13:57:34+5:302019-09-30T14:07:55+5:30
प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या टॉप २५ सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत आहे..
- नारायण बडगुजर
औद्योगिक वसाहतीतील गुन्हे तसेच जमीन खरेदी विक्रीचे गुन्हे वाढल्याने पिंपरी-चिंचवडसह औद्योगिक पट्ट्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्याचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांनी नुकताच पदभार स्वीकारला. गुन्हेगारी रोखण्याबाबतचे त्यांचे ' व्हिजन' जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...
गुन्हेगारी रोखण्यासाठी कशाला प्राधान्य देणार आहात... ?
औद्योगिक परिसरात शांतता राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. तेथील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करू. त्यांच्यावर ' वॉच ' ठेवणार.
महिला कर्मचारी, कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार... ?
पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत 'बडी कॉप' आहे. त्या संकल्पनेवर पिंपरी-चिंचवडमध्येही प्रयोग होईल. औद्योगिक परिसरातील महिला कामगार व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी महिला दक्षता समितीची दरमहा बैठक घेणार. सुरक्षेबाबत आढावा घेऊन उपाययोजना करणार.
गुन्हेगारी टोळ्या, भूमाफियांवर कारवाई करणार ..?
प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या टॉप २५ सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत आहे. रेकॉर्डवर नसल्यास मात्र सातत्याने दादागिरी करीत असल्याचे निदर्शनास आल्यासही या यादीत संबंधिताचा समावेश केला जाईल. त्यांची दैनंदिन माहिती पोलिसांकडून घेण्यात येईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना आहेत...?
राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे. त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल. काही तक्रार असल्यास आपआपसांत वाद न घालता संबंधित यंत्रणेकडे किंवा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
नवरात्रोत्सवात रोडरोमिओंना कसे रोखणार?
सार्वजनिक ठिकाणच्या दांडिया, गरबा आदींसाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येईल. महिला, तरुणींची छेडछाड होत असल्याचे दिसल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.
शहरवासीयांना पोलिसांकडून काय आवाहन?
शहरवासीयांनी स्वत:च्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला व शांततेला प्राधान्य द्यावे. त्यासाठी सतर्क रहावे, योग्य खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करावे. महिलांचा सन्मान करावा.
------------
गुन्हेगारी मोडीत काढणे आवश्यकच आहे. गुन्हेगार तयार होणार नाहीत, यासाठी गुन्हेगारीपासून तरुणांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करू. पोलीस नियमित कामकाज करतातच. सराईतांवर कारवाई होतेच. मात्र बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुणांचा तसेच अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तरुण व अशा अल्पवयीन मुलांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे.
- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड