मासेमारीचा वाद, डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; चिंचवडमधील धक्कादायक घटना
By प्रकाश गायकर | Published: June 8, 2024 06:33 PM2024-06-08T18:33:47+5:302024-06-08T18:34:14+5:30
पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तीन जणांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी दुपारी ...
पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तीन जणांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.
प्रसाद राजेश शिंदे (वय २६), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बाळू शंकर परदेशी (वय ५३, रा. मु.पो. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू परदेशी आणि मयत प्रसाद शिंदे हे मासेमारी करण्यासाठी शाहूनगर येथील तळ्यावर गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तीन संशयित आरोपींनी त्यांना येथे मासेमारी करू नका, असे सांगत शिवीगाळ केली, तसेच धक्काबुक्की करत येथे बसू नका, असे सांगितले. यावरूनच वाद झाल्याने प्रसाद यांच्या डोक्यात दगडाने मारत त्यांना पाण्यात ढकलून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या प्रसाद यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान प्रसाद यांचा मृत्यू झाला.