Pune | चांदखेड यात्रा गोळीबार प्रकरणी पाच आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:09 PM2023-01-12T18:09:19+5:302023-01-12T18:09:52+5:30
गोळीबारप्रकरणी अटक केलेल्या अनिकेत पवार याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत...
पिंपरी : मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रेमध्ये घुसून एका टोळक्याने दहशत निर्माण केली. तमाशाच्या तंबूत कोयत्याने तोडफोड करत गोळीबारही केला. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी घडली. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी पाच आरोपींना औंध येथून ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अविनाश बाळासाहेब गोठे (वय २२), विजय अशोक खंडागळे (वय १८, दोघे रा. चांदखेड), अमर उत्तम शिंदे (वय २२), मनीष शिवचरण यादव (वय २०, दोघे रा. परंदवडी, ता. मावळ), अनिकेत अनिल पवार (वय २६, रा. पवारनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी नवनाथ धायगुडे यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चांदखेड गावात यात्रा होती. यात्रेनिमित्त गावात तमाशा आणि इतर उत्सव सुरू होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी कोयते आणि पिस्तूल घेऊन आले. आरडाओरडा करत आरोपींनी वाहनांच्या काचा फोडल्या. तमाशाच्या तंबूत जाऊन आरोपींनी लोखंडी पेट्यावर कोयत्याने मारून नुकसान केले. यात्रेचे फ्लेक्स फाडले. अविनाश गोठे याने पिस्तूलमधून लोकांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. त्यानंतर आरोपी पळून गेले.
दहशतीसाठी केला गोळीबार?
गोळीबारप्रकरणी अटक केलेल्या अनिकेत पवार याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. तसेच अविनाश गोठे याच्यावर देखील यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडे आणखी कसून चौकशी करण्यात येत आहे.
किती गोळ्या झाडल्या?
आरोपींनी नेमक्या किती गोळ्या झाडल्या याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आरोपी गोळीबार करत असतानाचा व्हिडिओ देखील मिळाला आहे. पोलीस प्रत्यक्षदर्शींकडेही चौकशी करीत आहेत.