पिंपरी चिंचवडमध्ये वाढले अपघाताचे पाच ब्लॅक स्पाॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:00 PM2020-02-24T16:00:21+5:302020-02-24T16:00:53+5:30

उद्योगनगरीत अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’च्या संख्येत पाचने वाढ झाली आहे. त्यामुळे ती संख्या १८ वरून २३ वर गेली आहे. वाहनचालकांसाठी हा धोक्याचा इशारा असून, वाहन चालविताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Five black spots of accident rise in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये वाढले अपघाताचे पाच ब्लॅक स्पाॅट

पिंपरी चिंचवडमध्ये वाढले अपघाताचे पाच ब्लॅक स्पाॅट

Next

नारायण बडगुजर 

पिंपरी : बेशिस्त वाहनचालक व वाहतूक उपाययोजना तोकड्या असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अपघातांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी ‘डोकेदुखी’ ठरत आहे. त्यामुळे उद्योगनगरीत अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’च्या संख्येत पाचने वाढ झाली आहे. त्यामुळे ती संख्या १८ वरून २३ वर गेली आहे. वाहनचालकांसाठी हा धोक्याचा इशारा असून, वाहन चालविताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास पोलीस कमी पडत असून, त्यांच्याकडून कारवाईवर भर देण्यात येत आहे. पुरेशा योग्य उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सुमारे ४० लाख लोकसंख्या आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २२ लाख लोकसंख्या आहे. तसेच एमआयडीसीचा मोठा परिसर असून, हजारो लहान-मोठे उद्योग येथे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक व वर्दळ असते. त्यातच चिंचवड ते दापाडीदरम्यान महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूककोंडी होते. याचा परिणाम म्हणजे अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागत आहे. 

वाहतूक समस्यांविषयी आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आहे. जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होते. वाहतूक पोलीस, आरटीओ, स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी या समितीचे सदस्य असतात. 

असे निश्चित केले जातात ‘ब्लॅक स्पॉट’
ज्या ठिकाणी सातत्याने अपघात होतात. तसेच त्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागतो, अशा ठिकाणांना अपघात प्रवण अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात येते. तेथे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात येतात. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातात.

ठोस उपाययोजना नाहीत...
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून महापालिका, आळंदी, तळेगाव व चाकण नगर परिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह संबंधित प्रशासनाकडे उपाययोजना करण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यानुसार ब्लॅक स्पॉट तसेच आवश्यक तेथे गतिरोधक, रॅम्ब्लर स्ट्रिप्स, सिग्नल बसविण्यात येतात. तसेच दुभाजकांची दुरुस्ती करण्यात येते. दिशादर्शक व सूचना फलक लावण्यात येतात. बॅरिकेड्स लावण्यात येतात. पादचारी मार्गाची उभारणी केली जाते. मात्र, असे करूनही सातत्याने अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या उपाययोजना पुरेशा तसेच ठोस नसल्याचे दिसून येते. 

वाहतूक पोलीस, वार्डन गायब
पोलीस आयुक्तालयांतर्गत चिंचवड, निगडी, चाकण, भोसरी, सांगवी, देहूरोड, हिंजवडी, दिघी-आळंदी, तळवडे व पिंपरी असे दहा वाहतूक विभाग आहेत. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार वाहतूक नियमन केले जातात. मात्र, बहुतांश चौकांत वाहतूक पोलीस व वार्डन दिसून येत नाहीत.
 

Web Title: Five black spots of accident rise in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.