पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत पाचशे कोटींचे विषय मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:34 PM2020-03-01T17:34:19+5:302020-03-01T17:36:12+5:30
विषयपत्रिकेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे २६ प्रस्ताव
पिंपरी : महापालिका स्थायी समितीचा कालखंड महिनाअखेरीस पूर्ण होत असल्याने शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सभेत सुमारे ५३८ कोटींचे विषय मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. शेवटची सभा असल्याने स्थायी समितीचा रात्रीस खेळ सुरू होता.
महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती सभागृहात सायंकाळी साडेसहाला सभा सुरू झाली. ती रात्री नऊ वाजेपर्यंत चालू होती. विषयपत्रिकेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे २६ प्रस्ताव होते. शेवटची सभा असल्याने अधिकाधिक विषय आणण्यावर समितीचा भर होता. या सभेत अवलोकनाचे १२, प्रशासनाकडून अवलोकनाचे ७, मान्यतेचे १०३, प्रशासकीय मान्यतेचे ३२, सल्लागारांचे ८ असे एकुण १६२ विषय आिण ५३८ कोटींच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. त्यात ऐनवेळेसचे विषय अधिक होते.
रस्ते सफाईचा विषय आलाच नाही
स्थायी समिती सभेत ऐनवेळी मोठ्या संख्येने प्रस्ताव दाखल करून घेतले. तसेच यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या वादग्रस्त विषय शेवटच्या सभेत येणार याबाबत चर्चा होती. तसेच हा विषय येऊ नये, यासाठी भाजपातील एका गटाने खोडा घातला होता. यावरून दोन गटात वाद उद्भवू नये, यासाठी पालिकेत सुरक्षारक्षक असताना चक्क पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. पिंपरी पोलीस ठाण्याचे साध्या वेषातील पाच पोलिस कर्मचारी आणि एक उपनिरीक्षक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील स्थायी समिती बैठकीच्या दालनाबाहेर खडा पहारा देत होते. कचºयाचा विषय होणार नाही, असे समजल्यावर पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला.
स्थापत्यविषयक कामांचे विषय अधिक
शेवटच्या स्थायी समितीत स्थापत्यविषयक कामांचे विषय अधिक प्रमाणावर मंजूर करण्यात आले. त्यात डांबरीकरण, सिमेंट क्रॉक्रिटीकरणाचे विषय अधिक होते. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे विषय निविदा प्रक्रियेत अडकल्याने आणि भाजपातच आडवा आणि जिरवा धोरण सुरू असल्याने शेवटपर्यंत प्रयत्न करूनही विषय आणण्यात अपयश आले.
महत्वाचे विषय
१) मोशीतील रस्ते विकसित करणे -१० कोटी
२) बोºहाडेवस्ती येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणे-१२ कोटी
३) वायसीएम हॉस्पिटल चाणक्य विभाग दुरूस्ती -१० कोटी
४) चापेकर चौक चिंचवड अर्बनस्ट्रीट - ७.२५ कोटी
५) वायसीएम रूण्णालयातील डॉक्टर निवास स्थान-१० कोटी
६) पिंपरी ते चिंचवड लिंक रोड अर्बन स्ट्रिट- १२ कोटी.
७) बर्ड व्हॅली संभाजीनगर लेझर शो- १० कोट७० लाख