पाचशे रुपये दिले आणि पाच लाख काढून घेतले! नवी सांगवीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 02:23 PM2023-09-30T14:23:00+5:302023-09-30T14:23:11+5:30
पोलिसांनी संशयित यशिका शर्मा तसेच एका कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे...
पिंपरी : ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या पार्टटाइम कामाचे महिलेला ५०० रुपये दिले. पुढे काही रक्कम देऊन महिलेचा विश्वास संपादन करून अधिक रक्कम गुंतवल्यास चांगले कमिशन मिळेल. तसेच डिपॉॅझिट म्हणून काही पैसे भरण्यास सांगून तब्बल चार लाख ७९ हजार ४५२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना २९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नवी सांगवी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित यशिका शर्मा तसेच एका कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित यशिका हिने फिर्यादी यांना ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधला. स्काय स्कॅनर या कंपनीमध्ये ऑनलाइन तिकीट बुक करण्याचा पार्ट टाइम जॉब असल्याचे सांगून एक लिंक पाठवली. या लिंकद्वारे फिर्यादी महिलेने खाते उघडले. कामाच्या बदल्यात महिलेला प्रथम ५०० रुपये, नंतर सहा हजार ७०० आणि २४ हजार रुपये कमिशन म्हणून दिले. जास्त पैसे मिळवण्यासाठी महिलेला अमिष दाखवून चार वेळा पैसे डिपॉझिट करण्यास सांगून महिलेकडून चार लाख ७९ हजार ४५२ रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले.