पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू
By नारायण बडगुजर | Published: August 21, 2024 12:06 PM2024-08-21T12:06:05+5:302024-08-21T12:07:02+5:30
सिलिंडरच्या पाइपला गळती होऊन गॅसचा आगीशी संपर्क झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
पिंपरी : गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात पाचजण जखमी झाले. पिंपरी येथील बौध्दनगर परिसरात बुधवारी (दि. २१) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनोज कुमार (वय १९), धीरज कुमार (२३), गोविंद राम (२८), राम चेलाराम (४०), सत्येंदर राम (३०, सर्व रा. बौद्धनगर, इमारत क्रमांक १६च्या मागे, पिंपरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेले पाचही जण एकाच खोलीत एकत्र राहतात. ते मरकळ येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या खोलीतच ते स्वयंपाक करतात. त्यासाठी पाच किलोचा गॅस सिलेंडर त्यांच्याकडे होता. दरम्यान, सिलिंडरच्या पाइपला गळती होऊन गॅसचा आगीशी संपर्क झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात पाचही जण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत नागरिकांनी अग्निशामक विभागाला याबाबत माहिती दिलेली नव्हती. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील साहित्याचेही नुकसान झाले असून स्फोट कशामुळे झाला याबाबत शोध सुरू आहे.