नगरसेवकांसह कुटुंबासाठी पाच लाखांची विमा योजना; स्थायी समितीची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:35 AM2018-12-12T02:35:22+5:302018-12-12T02:35:55+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२६ नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात आली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२६ नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात आली आहे. ही योजना नगरसेवकांसह पत्नी अथवा पती आणि २१ वर्षांपर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू आहे. या योजनेसाठी २८ लाख ६४ हजार ८६५ रुपये खर्च होणार आहेत. या योजनेस स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ १२८ आहे, तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली. मात्र, १२८ पैकी सात नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास यापूर्वीच नकार दर्शविला आहे. त्यामुळे १२१ अधिक पाच स्वीकृत अशा १२६ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या २१ वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहील.
महापालिकेतर्फे मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमा कंपनीकडून विमा काढण्यात आला आहे. एक वर्षासाठी ५ लाख रुपये इतक्या रकमेच्या आरोग्य विमा योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या आरोग्य विमा योजनेसाठी मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २८ लाख ६४ हजार ८६५ रुपये अदा करण्यात येणार आहेत. तसेच २०२२ अखेर असणाऱ्या माजी नगरसदस्याचे आरोग्य विम्याचे दर वर्षी नूतनीकरण करण्यासही मान्यता देण्यात आली.