श्वानांना जीवे मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी; पिंपरी येथे विषप्रयोगात श्वानांच्या मृत्यूनंतर प्राणीमित्रांचा आरोप
By नारायण बडगुजर | Updated: April 16, 2025 22:06 IST2025-04-16T22:06:48+5:302025-04-16T22:06:48+5:30
भटक्या १२ श्वानांवर विषप्रयोग केल्याने त्यातील ३ श्वानांचा जागीच मृत्यू झाला होता

श्वानांना जीवे मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी; पिंपरी येथे विषप्रयोगात श्वानांच्या मृत्यूनंतर प्राणीमित्रांचा आरोप
पिंपरी : भटक्या १२ श्वानांवर विषप्रयोग केल्याने त्यातील ३ श्वानांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच इतर श्वानांची प्रकृती गंभीर होती. त्यातील आणखी चार श्वानांचा मृत्यू झाला. या श्वानांना जीवे मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप प्राणीमित्रांनी केला आहे.
पिंपरी येथील महिंद्रा ॲनथिया सोसायटीच्या आवारातील भटक्या श्वानांवर विष प्रयोग करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी उघड झाले. विषप्रयोग केल्यानंतर तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, उपचारादरम्यान आणखी चार श्वानांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण सात श्वानांचा मृत्यू झाला. तसेच पाच श्वानांची प्रकृती चिंताजनक आहे.
महिंद्रा ॲनथिया सोसायटीच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून २० ते २२ भटके श्वान वावरतात. भटक्या श्वानांवरून दोन गटांमध्ये वाद होते. भटके श्वान सोसायटीमध्ये नकोच, या एकाच हेतूने काही नागरिकांनी या श्वानांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या. काही नागरिकांनी मिळून या भटक्या श्वानांना जीवे मारण्यासाठी एका बाहेरच्या व्यक्तीला पैसे दिले. त्याबाबतचे काही पुरावे आमच्या हाती लागले आहेत. आम्ही ते पोलिसांकडे दिले असून पोलिस तपास करत आहेत, असे प्राणीप्रेमींनी सांगितले.
प्रत्येक मुक्या प्राण्याला जगण्याचा, अन्न मिळविण्याचा, राहण्याचा अधिकार आहे. भटक्या प्राण्यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केले नसून आपण त्यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. भटके श्वान जर चावा घेत असतील, अंगावर धावत असतील तर त्याचे पुरावे द्यावेत. महिंद्रा ॲनथिया सोसायटीमध्ये २० ते २२ भटके श्वान होते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी कोणलाही चावा घेतलेला नाही. भटक्या श्वानांना सोसायटीमध्ये फिडींग पॉइंट करण्यासाठी जागा द्यावी लागू नये, यासाठी हा प्रकार केला आहे. याबाबतचे काही पुरावे हाती लागले असून ते आम्ही पोलिसांकडे दिले आहेत - कुणाल कामत, प्राणीप्रेमी
भटक्या श्वानांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. या श्वानांना मारण्यासाठी कोणी पैसे दिले आहेत का, असा संशय काही प्राणीप्रेमींनी व्यक्त केला आहे. त्याचाही तपास सुरू आहे. मात्र, अद्याप त्या संदर्भात काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत - वनिता धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, संत तुकारामनगर पोलिस ठाणे