स्थायी समितीत पाच नवीन सदस्यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 08:32 PM2018-03-09T20:32:25+5:302018-03-09T20:34:26+5:30
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षात चुरस लागली आहे. ही निवड २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पाच वर्षात अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे . चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहे. त्यामुळे पाच नवीन सदस्यांची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे. ही निवड २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षात चुरस लागली आहे.
महापालिका स्थायी समितीत १६ सदस्य असून त्यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एकाचा समावेश आहे. पहिल्या वर्षांनंतर त्यातील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त होतात. यावर्षी सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीवर अधिक सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून अकराही सदस्यांचे राजीनामे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतले होते. व पाच वर्षांत ५५ सदस्यांना संधी देणार असे जाहीर केले होते.
त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे हे भाजपचे सहा सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यानंतर, या सदस्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती केली. या ड्रॉ पध्दतीमध्ये भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा.उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच अपक्ष कैलास बारणे हे बचावले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये यासाठी भाजपने चिठ्ठीतून बचाविलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर भाजप नेतृत्त्वाने शुक्रवारी राजीनामे मंजूर करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार, महापौर नितीन काळजे यांनी राजीनामे मंजूर केल्याचे लेखी पत्र नगरसचिव विभागाला दिले. आता स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची मार्च महिन्याच्या सर्वसाधारणसभेत नियुक्ती केली जाणार आहे.
नेत्यांचे उंबरे झिजविताहेत नगरसेवक
रिक्त झालेल्या पाच जागांवर संधी मिळावी, म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी नेत्यांकडे साकडे घातले आहे. याच समितीत संधी मिळावी, म्हणून नगरसेवक नेत्यांचे उंबरे झिजवित आहेत. या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे.