डिलिव्हरी बॉयकडून सिगारेट चोरणाऱ्या पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:59 PM2020-01-08T18:59:38+5:302020-01-08T19:09:02+5:30
डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून केली चोरी..
पिंपरी : डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून एक लाख १५ हजार ८४४ रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या पाच चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
अतुल चंद्रकांत निसर्गंध (वय २०), ओंकार उर्फ बाबू नंदकुमार वैराट (वय १९), अँथोनी डॅनियल अरकस्वामी (वय २०), राहुल प्रदीप शिंदे (वय २४, सर्व रा. घरकुल, चिखली),विकास पोपट वायकर (वय २१, रा. चºहोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोशन रमेश वाधवानी (वय ३९, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाधवानी यांचे पिंपरी येथील शगुन चौकात दुकान आहे. आशिष हरले त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. आशिष २७ डिसेंबर रोजी सकाळी दुचाकीवरून सिगारेटची डिलिव्हरी देण्यासाठी मारुंजी येथे जात होता. आरोपींनी त्याला थेरगाव येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर आशिष याला मारहाण करून त्याच्याकडील एक लाख १५ हजार ८४४ रुपये किमतीची सिगारेटची बॅग हिसकावून घेतली आणि आरोपींनी पोबारा केला.
फिर्यादी वाधवानी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मुंबईहून आल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींचा माग काढत थेरगाव, चिंचवड जकातनाका, बिजलीनगर पाण्याची टाकी, खंडोबा माळ चौक, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कृष्णानगर मार्गे चिखली या मार्गावरील ठिकठिकाणचे सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेºयांचे फॅुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढली. त्यानंतर चिखली परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि सिगारेट असा एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापुसाहेब धुमाळ, प्रमोद भांडवलकर, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले यांनी ही कामगिरी केली.
तीन आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींपैकी तिघांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी अतुल निसर्गंध याच्याविरोधात चाकण, देहुरोड, निगडी आणि वाकड या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपी अँथोनी अरकस्वामी याच्यावर चिखली, तर आरोपी राहुल शिंदे याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.