स्थायीत वाढीव खर्चाचा धडाका
By admin | Published: May 11, 2016 12:24 AM2016-05-11T00:24:11+5:302016-05-11T00:24:11+5:30
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने वाढीव आणि सुधारित खर्चाचा धडाका लावला आहे. ऐनवेळी विषय घुसडून कोट्यवधी रुपयांच्या वाढीव
पिंपरी : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने वाढीव आणि सुधारित खर्चाचा धडाका लावला आहे. ऐनवेळी विषय घुसडून कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी घेण्याचा सपाटाच लावला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत तीन ऐनवेळच्या विषयांच्या माध्यमातून सुमारे
९० लाखांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली. स्थायी समिती ठेकेदारांवर मेहेरबान झाल्याचे दिसून येत
आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. वाढीव खर्चाच्या विषयांना ऐनवेळी मंजुरी दिली जात असून, स्थायीतील सर्वपक्षीय सदस्यांनी ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ४०मधील कामगारनगर, गंगानगर परिसरात जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामासाठी १६ लाख ५३ हजार रुपये खर्चाला स्थायी समितीने फेबु्रवारी २०१६ला मंजुरी दिली होती. मंगळवारी पुन्हा या कामासाठी २१ लाख ७३ हजारांच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ६१ दापोडी गावठाण एसएमएस कॉलनी परिसरात रेडमिक्स पद्धतीने काँक्रीट पेव्हिंग ब्लॉक, गटर्स करणे व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी स्थायी समितीने फेबु्रवारी २०१६मध्ये १८ लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. आता याच कामासाठी ३१ लाख ८० हजार रुपयांच्या वाढीव खर्चाला स्थायीने मंजुरी दिली आहे.
यासह प्रभाग ६१मधील सांगवी पुलापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पदपथ बांधणे व रबर मोल्डिंग पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामासाठी १५ लाखांच्या खर्चास मार्च २०१६ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याच कामासाठी ३४ लाखांच्या सुधारित खर्चास मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे.
अशा प्रकारे मंगळवारी स्थायी समितीने तीन ऐनवेळच्या विषयातून ९० लाखांच्या वाढीव खर्चास विनाचर्चा मंजुरी दिली. (प्रतिनिधी)