पावसानंतर विसर्जन घाटावर भक्तीचा पूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 09:05 PM2023-09-28T21:05:07+5:302023-09-28T21:05:56+5:30
पिंपरी गावातील काही मंडळाच्या मिरवणुका दुपारी बारा वाजता सुरू झाल्या. पिंपरी कॅम्प परिसरात देखील डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या.
नारायण बडगुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना पावसाने जोरदार हजेरी लावली. भर पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायम होता. पाऊस थांबल्यानंतर विसर्जन घाटांवर भक्तीचा पूर आला.
पिंपरी गावातील काही मंडळाच्या मिरवणुका दुपारी बारा वाजता सुरू झाल्या. पिंपरी कॅम्प परिसरात देखील डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या. नेहरूनगर, मोरवाडी, अजमेरा परिसरातील मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. या मंडळाचे पिंपरीतील शगुन चौकात महापालिकेच्या कक्षात स्वागत करण्यात आले. गुलाल, भंडारा, फुलांची उधळण करण्यात आली. विसर्जन घाटांवर तसेच मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभले आहे.
बाप्पाची छबी टिपण्यासाठी धडपड
विसर्जन घाटांवर बाप्पाला निरोप देताना तरूण व तरुणींनी मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला. तसेच मोबाईलमध्ये बाप्पाची छबी टिपण्यासाठी धडपड केली.
उत्साहासोबत शिस्त
मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांचा उत्साह मोठा आहे. गणेश मंडळांकडून शिस्तबद्धपणे मिरवणुका काढण्यात येत आहेत. त्यामुळे विसर्जन सोहळा शांततेत पार पडत आहे.