उद्योगनगरीतील पूरग्रस्तांना महिन्याभरानंतरही मिळाला नाही मदतनिधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:51 PM2019-09-07T17:51:10+5:302019-09-07T17:51:55+5:30
पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना गेल्या महिन्यात मोठा पूर आला होता.
- नारायण बडगुजर-
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पूरग्रस्त कुटुंबांना शासनाकडून धान्य तसेच १५ हजारांची मदत जाहीर करण्यात आली. शहरात ४८८० कुटुंब पूरग्रस्त असून त्यातील १५०६ कुटुंबांना मदतीची पूर्ण रक्कम मिळाली. उर्वरित ३३७४ कुटुंबांना केवळ पाच हजार रुपये देण्यात आले असून, महिनाभरानंतरही या पूरग्रस्तांना दहा हजार रुपये मिळालेले नाहीत. तसेच त्यांच्या बँकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड, नावातील घोळ आदी तांत्रिक अडचणीही समोर येत आहेत. या पूरग्रस्त कुटुंबांसाठी सुमारे साडेतीन कोटींची मागणी महसूल विभागातर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती होती. त्यामुळे पूरग्रस्त भागात पंचनामे करून पूरग्रस्तांसाठी शासनातर्फे धान्य तसेच आर्थिकस्वरुपात मदत जाहीर करण्यात आली. त्यासाठी शहरात पूरग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले. मंडलाधिकारी यांच्या उपस्थितीत सुमारे ६० कर्मचाºयांनी पंचनामे केले. त्यानुसार शहरात ४८८० कुटुंबे पूरग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. या प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ असे धान्यवाटप करण्यात आले. तसेच पहिल्या टप्प्यात १५०६ पूरग्रस्त कुटुंबांना १५ हजारांचा मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला.
उर्वरित ३३७४ पूरग्रस्त कुटुंबांना केवळ पाच हजार रुपये मिळाले असून, आणखी १० हजार रुपये मिळण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. पूरग्रस्तांची माहिती एका राष्ट्रीयकृत बँकेकडे देण्यात आली आहे. मात्र पूरग्रस्तांची संख्या जास्त असल्याने या बँकेतील यंत्रणेचाही गोंधळ उडाला आहे.
.................
बँकेने इंग्रजीत मागविली माहिती
पूरग्रस्तांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाइल क्रमांक, नाव आदी माहिती बँकेला उपलब्ध करून देण्यात आली. मात्र बँकेचे कामकाज इंग्रजीतून होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही सर्व माहिती इंग्रजीत करून देण्यात आली. असे करताना नावाचे स्पेलिंग, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी चुका समोर आल्या आहेत. परिणामी त्याची दुरुस्ती करण्यात महसूल विभागातील कर्मचारी गुंतले आहेत. हीच माहिती राज्य शासनाच्या ट्रेझरी विभागाकडे मराठी भाषेत देण्यात आली.
पिंपरीत सर्वाधिक २४२० कुटुंब
पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना गेल्या महिन्यात मोठा पूर आला होता. पुराचे तसेच पावसाचे पाणी नदीकाठच्या घरांमध्ये व झोपडपट्ट्यांमध्ये शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांना याची झळ बसली. महसूल विभागाने पंचनामे केले असून त्यानुसार झोपडपट्टी बहुल असलेल्या पिंपरीत सर्वाधिक २४२० कुटुंबे पूरग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
पूरग्रस्तांसाठी साडेतीन कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाकडे त्याबाबत प्रस्ताव पाठविलेला आहे. बँकेला पूरग्रस्तांची माहिती दिली आहे. पूरग्रस्तांचा खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी कोड आदींमध्ये चुका असल्यास त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर पूरग्रस्तांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होईल.
- गीता गायकवाड, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
...........
पंचानामे केल्यानुसार विभागनिहाय पूरग्रस्त कुटुंबे
सांगवी - ६१५
रहाटणी - २६७
पिंपळे गुरव - १६५
कासारवाडी - ३१८
दापोडी - ८६८
बोपखेल - ६४
फुगेवाडी - ६४
पिंपरी - २४२०
चिंचवड - ४९
रावेत - ५०
एकूण - ४८८०