देहूतील इंद्रायणी नदीला महापूर; मावळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:46 PM2021-07-22T17:46:44+5:302021-07-22T17:53:25+5:30
आज सकाळपासून शेलारवाडी, किन्हई परिसरातील ओढे व नाले प्रथमच तुडुंब भरून वाहताना दिसत होते.
देहूरोड : मावळ परिसरात सोमवारपासून दमदार पाऊस पडत असून बुधवारी मध्यरात्रीनंतर अक्षरशः हाहाकार माजवला आहे. गुरुवारी सकाळपासून इंद्रायणीनदीला आलेला पूर वाढत चालला असून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने कुंडमळा येथील सिमेंट बंधारा पाण्याखाली गेलेला आहे.
नदीकाठी असलेले कुंडदेवी मंदिर सकाळपासून पाण्याखाली गेलेले आहे. कुंडमळा भागातून शेलारमळा , शेलारवाडी व देहूरोड बाजारपेठेकडे येण्यासाठी छोट्या लोखंडी साकव पुलाची सोया असतानाही सालकाव पुलाला जोडणारा नदीपात्रालगतचा जोडरस्ता दुपारनंतर पाण्याखाली गेला असल्याने ये - जा करणे ठप्प झाले आहे .
आज सकाळपासून शेलारवाडी, किन्हई परिसरातील ओढे व नाले प्रथमच तुडुंब भरून वाहताना दिसत होते. विविध रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोयही झाली. जोरदार पावसाने कुंडमळा, शेलारवाडी, किन्हई भागातील भात खाचरात व शेतात इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांची भात खाचरे पाण्याने भरून गेले आहेत. भात पिकाला पोषक व पुरेसा पाऊस पडला आहे.