मावळात दरवळतोय फुलांचा सुगंध, फुलशेतीतून होतेय कोट्यवधींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 02:54 AM2018-02-02T02:54:10+5:302018-02-02T02:54:26+5:30
मावळ तालुका आणि फूल उत्पादन हे एक समीकरणच बनले आहे. मावळात मागील काही वर्षांपासून फुलशेती चांगलीच बहरू लागली असल्याने फुलांच्या सुगंधासह स्थानिक नागरिक व महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मावळ - मावळ तालुका आणि फूल उत्पादन हे एक समीकरणच बनले आहे. मावळात मागील काही वर्षांपासून फुलशेती चांगलीच बहरू लागली असल्याने फुलांच्या सुगंधासह स्थानिक नागरिक व महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येथील गुलाबाच्या फुलांसह इतरही फुलांची देशात, परदेशात निर्यात होत असून, यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर शेतक-यांसाठी ठरतेय वरदान
तळेगाव दाभाडे : पुणे- मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळ उभारण्यात आलेले राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे (एनआयपीएचटी) हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.
येथे हरितगृहे व फुलशेतीची अद्ययावत माहिती देण्यात येते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेची स्थापना कृषी उत्पादनोत्तर तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टीने व उपयुक्त यशस्वी तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये उत्पादकापर्यंत पोहोचविण्याकरिता केली आहे. शेतीमधून रोजगार निर्मितीस चालना देणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
देशातील पुष्ष व्यवसायास दिशा देण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व नेदरलँडच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने व तांत्रिक सहकार्याने सन २००२ मध्ये एनआयपीएचटी संस्थेमध्ये हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात आली. जागतिक बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून फुले, फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन, मूल्यवर्धीत तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढिवणे, उच्च तंत्रज्ञान प्रसारित करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे.
हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमार्फत ‘प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण’ या संकल्पनेतून राज्यातील तसेच देशातील इतर राज्यांतील सुमारे ४० हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पाकिस्तान, श्रीलंका, भूतान, नेपाळ, फ्रान्स, आफ्रिका आदी देशांतील काही शेतकरी व कृषी अधिकारी यांनीही येथे प्रशिक्षण घेतले आहे. एनआयपीएचटी संस्थेचे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर हे आशिया खंडातील प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देणारे एकमेव मोठे केंद्र आहे. प्रशिक्षणासाठी लागणारी सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहे. येथे विविध प्रकारची हरितगृहे, यंत्रसामग्री, अॅटोमॅटिक फर्टिगेशन सिस्टीम, प्रीकुलिंग, कोल्ड स्टोअरेज आणि ग्रेडिंग पॅकेजिंग, पॅक हाऊस, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, अत्याधुनिक उतिसंवर्धन प्रयोगशाळा, दृकश्राव्य सुविधा असलेले भव्य क्लासरूम, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशकांची कृषी विषयक पुस्तके व मासिकांनी सज्ज असलेले उत्तम ग्रंथालय, इंटरनेट सुविधा येथे येणाºया प्रत्येक प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध आहेत.
या ठिकाणी एक दिवसीय, तीन दिवसीय, पाच दिवसीय हे कमी कालावधीचे व एक महिन्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
शेतक-यांना प्रशिक्षण
केंद्रात असलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतून गेल्या १५ वर्षांत राज्यातील व परराज्यातील सुमारे ४० हजार शेतकºयांनी प्रशिक्षण घेतले आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात हरितगृह व्यवस्थापन, शेडहाऊस तंत्रज्ञान, लँडस्केपिंग व्यवस्थापन, उती संवर्धन तंत्रज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन यांचा समावेश आहे. तर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात रोपवाटिका व्यवस्थापन, पणन व्यवस्थापन, फळे व भाजीपाला प्रक्रिया यांचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्या
केंद्र शासनाच्या माध्यमातून या संस्थेत नव्याने फुले गुणवत्ता केंद्र उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च येणार आहे. फुले गुणवत्ता केंद्रात नेदरलँड येथील हायटेक हरितगृहाचे (फोर्स एयर व्हेंटिलेशन) तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामध्ये १ हेक्टर क्षेत्रात विविध हरितगृहामध्ये कोकोपीटमधील ग्रोबॅक व लालमातीचे बेड यावर गुलाब, जरबेरा, कार्नेशन, क्रिशांथीमम या फुलपिकांची लागवड करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी संस्थेतील प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे संचालक रामेंद्रकुमार जोशी व व्यवस्थापक रवींद्र देशमुख यांनी केले आहे.
थंड हवामान ठरतेय फुलशेतीसाठी पोषक
१कामशेत : येथील नाणे मावळात मागील काही वर्षांपासून गुलाबाची फुलशेती चांगलीच बहरू लागली असल्याने परिसरातील गुलाबाच्या गंधासह स्थानिक नागरिक व महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी व महिलांना या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होत आहे़ त्यामुळे कुटुंबालाही हातभार लागत आहे. मावळ तालुक्यातील थंड हवामान गुलाब व फुलशेतीसाठी पोषक असल्याने मागील काही वर्षांमध्ये नाणे मावळात फूल उत्पादक कंपन्यांनी चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यात या भागात टाटाचे शिरोता व पाटबंधारे विभागाचे वडीवळे धरण प्रकल्प असल्याने शिवाय इंद्रायणी व कुंडलिका या नद्या दुथड्या भरून वाहत असल्याने पाण्याची कमतरता नाही. यामुळे या भागात फुलशेती व गुलाब शेतीच्या व्यवसायात मोठी वृद्धी झाली आहे.
२या पट्ट्यात सुमारे दहा ते बारा फुलशेती व्यवसायाच्या कंपन्या असून, याशिवाय काही स्थानिक नागरिकही या व्यवसायात तग धरू लागले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली असून, आपली शेती सांभाळून अनेक स्थानिक नागरिकांसह महिलाही या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. फूल उत्पादक व्यावसायिकांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ऐन हंगामाचा काळ असल्याने कामगारांचा कामाचा ताण वाढत आहे. या भागात गुलाबाचे वर्षभर उत्पादन सुरू असले तरी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत फुलांना जास्त मागणी असल्याने सरासरी या काळात हा व्यवसाय तेजीत असतो.
३ त्यात गुलाबांच्या फुलांना स्वदेशा सह विदेशातून मोठी मागणी असल्याने या व्यवसायातील कर्मचारी अहोरात्र काम करताना दिसतात. मात्र त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मिळणारे वेतन अपुरे असल्याने अनेक स्थानिक नागरिक या कामात न पडता शहरी भागात दुसरे काम पसंत करीत असल्याने ग्रामीण भागातील महिला मात्र या ठिकाणी काम करण्यास तयार होत आहेत. या सर्व अडचणींमुळे कंपनी व्यवस्थापकांना परराज्यातील कामगार आयात करण्याची स्थिती निर्माण होत आहे. याचाही फायदा स्थानिक नागरिक व गावांना होत असून, त्यामुळेच छोटे मोठे हॉटेल, किराणा मालाच्या टपºया आदी व्यवसायात स्थानिक पडू लागले असल्याने गुलाब बहरला. स्थानिकांना मिळालेल्या रोजगार व व्यवसाय संधीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.