पिंपरी महापालिकेतील नागर विभाग सहायक आयुक्तांच्या खुर्चीला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:45 PM2019-01-31T13:45:43+5:302019-01-31T13:49:08+5:30
संतापलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक सहायक आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा अभिनव पद्धतीने निषेध केला.
पिंपरी : महापालिका मुख्यालयात सभावृत्तांत घेण्यासाठी आलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिका-यांनी दोन तास वाट पाहूनही नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्यांनी झगडे यांच्या रिकाम्या खुचीर्लाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या भुमिकेचा अभिनव पद्धतीने निषेध केला.
दिव्यांग नागरिकांना ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त केला जात असून झगडे यांच्या कार्यपद्धतीवर दिव्यांग नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था आणि नागरवस्ती विकास योजना विभागाची एकत्रित सभा पार पडली होती. या सभेचा वृत्तांत घेण्यासाठी पदाधिकारी या विभागात आले. सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडून ही माहिती मिळणे अपेक्षित होते. त्याकरिता महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नागरवस्ती विभागात हे सर्व पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी सकाळी आले होते. मात्र, या विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने दिव्यांग नागरिकांनी दोन तास वाट पाहिली. एक वाजले तरी एकही अधिकारी कार्यालयात हजर झाला नाही. त्यामुळे दिव्यांग पदाधिका-यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या पदाधिका-यांनी बाहेरून एक हार मागवून सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला घालून, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. दिव्यांग नागरिकांना ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त केला जात असून झगडे यांच्या कार्यपद्धतीवर दिव्यांग नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.
पाठपुरावा करुनही अपंग विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमणे व शहरात होत असलेल्या अपंग भवनाबाबत संघटनेबरोबर बैठक घेण्याबाबत निर्णय होत नाही. झालेल्या सभेचा वृत्तांत मिळत नसल्याने संघटनेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.