पवना नदीतील जलपर्णी गेली वाहून ; पावसाने वाचविले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:17 PM2018-07-16T16:17:45+5:302018-07-16T16:28:12+5:30
किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील पवना नदीच्या पात्रातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे .
किवळे : गेल्या काही दिवसात पडलेल्या जोरदार पावसाने पवना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून नदीच्या वाढलेल्या पाण्यात किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असून उर्वरित जलपर्णीर्ही वाहून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे . जलपर्णी वाहून गेल्याने महापालिकेचा नदीतील जलपर्णी काढण्याचा मोठा खर्च वाचला आहे.जलपर्णी वाहून गेल्याने पवना नदीने मोकळा श्वास घेतला असून पंचक्रोशीतील नागरिकांना पवना नदीच्या पाण्याचे दर्शन होऊ लागले आहे. भविष्यात पुन्हा नदीपात्रात जलपर्णी येऊ नये याकरिता महापालिकेने दक्ष राहून कार्यवाही करायला हवी , असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत .
पवना नदीच्या पात्रात किवळे गावठाण , स्मशानभूमी , देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावरील नदीच्या पुलापासून ते रावेत गावाशेजारी असणाऱ्या बंधाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली होती. किवळे व रावेत परिसरात नदीत पाण्याऐवजी संपूर्ण जलपर्णीचे आच्छादन दिसू लागले होते. जलपर्णीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याबाबत चालढकल होत होती . गेल्या आठवडाभरात मावळात दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या येणाऱ्या मोठ्या लोंढ्याने किवळे , रावेत परिसरातील सर्व जलपर्णी वाहून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे .