जगताप डेअरी चौकात उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर
By Admin | Published: October 1, 2016 03:40 AM2016-10-01T03:40:17+5:302016-10-01T03:40:17+5:30
सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावर जगताप डेअरी, साई चौक येथे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाबाबत पुण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत या चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर
पिंपरी : सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावर जगताप डेअरी, साई चौक येथे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाबाबत पुण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत या चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हे दोन्ही उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मान्यता दिली आहे.
पुण्यात झालेल्या या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील, आशाराणी पाटील यासह सर्व अभियंते उपस्थित होते. महापालिकेने सांगवी ते किवळे या मार्गावर बीआरटीएस सुविधा सुरू केली आहे. पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातून हा मार्ग जातो. हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी परिसरात वास्तव्याला आहेत.
दरम्यान, या कर्मचाऱ्यांसह येथील नागरिक सांगवी ते किवळे या बीआरटीएस मार्गावरील जगताप डेअरी, साई चौकातून हिंजवडीच्या दिशेने जातात. या चौकात चारही बाजूने रस्ते येत असल्यामुळे तेथे वाहतूककोंडी होते. त्यावर उपाय म्हणून साई चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
यासह साई चौकात उड्डाणपुलासोबतच ग्रेड सेपरेटरही उभारणे शक्य असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हे दोन्ही उभारण्यास परवानगी दिली, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.(प्रतिनिधी)