भक्ती-शक्ती चौकात उभारणार उड्डाणपूल
By admin | Published: May 25, 2017 02:54 AM2017-05-25T02:54:02+5:302017-05-25T02:54:02+5:30
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. या कामासाठी ९० कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारताना भक्ती-शक्ती शिल्पसमूह आणि चौकाच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली.
महापालिकेने जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर निगडी ते दापोडी यादरम्यान बीआरटीएस रस्ता विकसित केला आहे. हा रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी पिंपरी, चिंचवड स्टेशन आणि आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकात ग्रेड सेपरेटर व नाशिक फाटा येथे उड्डाणपूल उभारला आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात वाहतूककोंडीची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला. स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे व सदस्यांनी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारताना भक्ती-शक्ती शिल्पसमूह व चौकाच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.