अन्न, औषध प्रशासनाचे शहराकडे दुर्लक्ष, विनापरवाना व्यवसाय वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:56 AM2018-03-11T05:56:02+5:302018-03-11T05:56:02+5:30
शहरात गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हॉटेल व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना ढाबे, तसेच हॉटेल राजरोसपणे चालवली जात आहेत. अशा हॉटेल व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई होत नाही. बेकायदा गुटखाविक्री करणाºयांना लक्ष्य केले जात असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
पिंपरी - शहरात गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हॉटेल व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना ढाबे, तसेच हॉटेल राजरोसपणे चालवली जात आहेत. अशा हॉटेल व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई होत नाही. बेकायदा गुटखाविक्री करणाºयांना लक्ष्य केले जात असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय पुण्यात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॉटेल आस्थापना, तसेच अन्नपदार्थ विक्रेते आणि अन्न भेसळ करणाºयांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे.
महापालिका हद्दीत परवानाधारक अशी सुमारे ६०० हॉटेल आहेत. ४०० हॉटेलचालक हॉटेल असोसिएशनचे सदस्य आहेत. या व्यतिरिक्त ढाबे, छोटी हॉटेल, हातगाडी, टपºयांवर अन्नपदार्थ विक्री करणाºयांची संख्या मोठी आहे. दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगवी येथे कारवाई करून सुमारे दहा लाखांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. गुटखा, तसेच शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ याचा साठा केलेल्या पिंपरी-चिंचवडच्या विविध भागातील सुमारे ३०० हून अधिक पान टपºयांची तपासणी करून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. मालाचा साठा, तसेच वाहनांची जप्ती करून फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत.
२०११ पर्यंत अन्न भेसळ करणाºयांविरुद्धची कारवाई महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत केली जात होती. महापालिका क्षेत्रातील अन्नभेसळ प्रकरणी तक्रार येताच, काही वेळातच अन्न पर्यवेक्षक आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचत असे. प्रसंगी तातडीने अथवा रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर फौजदारी खटले दाखल केले जात होते.
अन्नसुरक्षा व मानके कायदा अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अन्न पर्यवेक्षक, अन्न निरीक्षक पदावरील कर्मचारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अखत्यारित काम करू लागले. महापालिका आस्थापनावरून या पाच कर्मचाºयांना शासन सेवेत वर्ग करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही प्रस्ताव अनिर्णित आहे. या कर्मचाºयांना वेतन महापालिकेकडून मिळते. ते काम मात्र अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवकुमार नारगुडे यांच्या अधिकारांतर्गत करत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये काही करवाई करावयाची असल्यास त्यांना पुणे कार्यालयाशी संपर्क साधून वरिष्ठ अधिकाºयांची संमती घेऊन कारवाईचे पुढील पाऊल उचलावे लागते. त्यामुळे मर्यादा येऊ लागल्या आहेत. परिणामी पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय पुण्यात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पुढील काळात पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणार आहे. केवळ गुटखा विक्री करणाºयांवरच कारवाई होत आहे, असे नाही. अन्न भेसळ करणारे हॉटेलचालक, विक्रेते, मिठाई विक्रेते यांच्यावरसुद्धा कारवाई केली जात आहे. उघड्यावर अन्नपदार्थ विक्री करणाºयांवर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे.
- शिवकुमार नारगुडे, सहायक आयुक्त