स्वच्छता न पाळताच तयार होतात खाद्यपदार्थ; पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:07 PM2018-02-26T14:07:53+5:302018-02-26T14:07:53+5:30
व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचते. यातून विषबाधेसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना स्वच्छतेसह अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून होत आहे.
सांगवी : उद्योगनगरीत केटरिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या व्यावसायिकांकडून अनेकदा स्वच्छता पाळण्यात येत नाही. त्यामुळे या व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचते. यातून विषबाधेसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना स्वच्छतेसह अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आणि सांगवी परिसरात ठिकठिकाणी केटरिंग व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. सांगवी परिसरातील मुख्य रस्त्याला आणि आतील भागातील परिसरात केटरिंग व्यावसायिक बिर्याणी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून विकतात. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा यात समावेश असतो. या व्यावसायिकांकडून शेकडो ग्राहक खाद्यपदार्थ विकत घेतात. अर्धा किलो बिर्याणीपासून ते आवश्यकतेनुसार या व्यावसायिकांकडून ‘पार्सल’च्या माध्यमातून बिर्याणी आदी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. पार्टी, वाढदिवस, मुंज, डोहाळे, लग्न अशा विविध सोहळ्यांसाठी तयार जेवण मागविण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. त्यासाठी अशा केटरिंग व्यावसायिकांकडून तयार जेवण मागविण्यात येते. १०, २५, ५० जणांचे जेवण किंवा त्याहीपेक्षा जास्त जणांसाठीचे जेवण मागणीनुसार व्यावसायिकांकडून उपलब्ध करून देण्यात येते.
घरातील कोणत्याही सोहळ्यासाठी किंवा प्रसंगासाठी घरी जेवण तयार करण्याचे आता टाळण्यात येते. पुरेसे मनुष्यबळ, वेळेचा अभाव, जेवण तयार करण्यातील कुशलता, त्यामुळे जेवण रुचकर होईल की, नाही याबाबतची साशंकता, साधनांचा अभाव, जागेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे घरच्या घरी स्वयंपाक करणे टाळले जाते.
केटरिंग व्यावसायिक तयार जेवण सहज उपलब्ध करून देतात. त्यांच्याकडे साधनांची उपलब्धता, मनुष्यबळ, जागा, टेबल आणि ताट, ग्लास आदी भांडी, पिण्याचे पाणी आदी सर्व बाबी उपलब्ध असतात. यासह जेवण घरी किंवा इच्छित स्थळी पोहचवून ‘बुफे’ सेवाही पुरविली जाते. त्यानंतर हे सर्व साहित्य व्यावसायिक कार्यक्रमाच्या ठिकाणाहून पुन्हा स्वत: घेऊनही जातात. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांना किंवा संबंधिताना कोणत्याही प्रकारच्या नियोजनाची आवश्यकता राहत नाही.
सांगवी येथील मुख्य रस्ता, कृष्णा चौक, काटेपुरम् चौक ते पिंपळे गुरव परिसरात अशा व्यावसायिकांची दुकाने आहेत. यातील बहुतांश व्यावसायिक नियम आणि स्वच्छताही पाळत नाहीत.
मजूर, कारागिरांचे व्यसन
केटरिंग व्यावसायिकांकडे ८० टक्के कामगार परराज्यांतील असतात. त्यांना कमी रोजंदारीवर काम करावे लागते. जास्त पैसे मिळावेत म्हणून जास्तीत जास्त काम करण्यावर त्यांचा भर असतो. याचा परिणाम त्यांच्या राहणीमानावर होतो. नियमित आंघोळ न करणे किंवा हात-पाय न धुणे, कपडे स्वच्छ नसणे, झोप पूर्ण न होणे आदी प्रकार वाढीस लागतात. यातून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. यासह असे मजूर आणि कारागीर व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. खाद्यपदार्थ तयार करताना धूम्रपान करणे, गुटखा चघळणे, तंबाखू खाणे आदी व्यसन केले जाते.
व्यावसायिकांचीही उदासीनता
मजूर आणि कारागिरांसह खुद्द व्यावसायिकही स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. मजूर किंवा कारागिरांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. खाद्यपदार्थ तयार करण्याची भांडी आणि तयार केलेले खाद्यपदार्थ ठेवण्याची भांडीही काळवंडलेली आणि अस्वच्छ असतात. तसेच खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणीही अशीच अस्वच्छता असते. त्याला आळा बसणे आवश्यक आहे. महापालिका आणि अन्न औषध प्रशासनासह संबंधित यंत्रणांकडून अशा व्यावसायिकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
खाद्यपदार्थ तयार कसे होतात, कुठे तयार केले जातात, त्याची स्वच्छता, दर्जा याबाबत फारसा विचार केला जात नाही. काही मोजकेच व्यावसायिक नियम, अटी आणि स्वच्छता पाळतात. अनेक व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करतात.
- तुकाराम आरेकर, ज्येष्ठ नागरिक, सांगवी