कमानी उभारण्यास मनाई
By admin | Published: June 15, 2017 04:50 AM2017-06-15T04:50:21+5:302017-06-15T04:50:21+5:30
निगडी ते आकुर्डी दरम्यान पालखी मार्गावर सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय पदाधिकारी यांना मंडप, स्टॉल किंवा कमानी उभारण्यास मनाई केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : निगडी ते आकुर्डी दरम्यान पालखी मार्गावर सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय पदाधिकारी यांना मंडप, स्टॉल किंवा कमानी उभारण्यास मनाई केली आहे. दहशतवादी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पालखी मार्गाला अडथळा ठरू नये, याकरिता महापालिकेची एक कमान व स्वागत कक्ष वगळता अन्य कोणत्याही संस्थेला परवाने देण्यात येऊ नयेत, अशी सूचना पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
संत तुकाराममहाराज पालखी सोहळा १७ जूनला आकुर्डीत मुक्कामी येणार आहे. सोहळा शहरात आल्यानंतर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना, मंडळे,राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी मंडप, स्वागत कमानी उभारण्यात येतात. मात्र, या मंडप आणि कमानींमुळे पालखी मार्गाला अडथळा निर्माण होतो. दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कमानी आणि मंडप अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. कोणत्याही संस्था, संघटनेला स्वागत कमान अथवा मंडप टाकण्यासाठी परवाने देण्यात येऊ नयेत, अशी सूचना पत्राद्वारे केली आहे. महापालिकेच्या वतीने केवळ एकच कमान आणि स्वागत कक्ष निगडी जकात नाका येथे उभारण्यात यावा.
पालखी मार्गावर भाविकांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून अन्न निरीक्षकासह पथकाची नेमणूक करावी.
लहान रस्त्यांवर लाकडी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करावेत. भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीत अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक राखीव ठेवावे. मार्गावरील कचराकुंड्या तपासणी, अनावश्यक कचराकुंड्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्यत्र हलविण्यासाठी स्वतंत्र पथक
नेमावे, मोकाट जनावरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे. मंदिराजवळ बॅरिकेड्स करावेत.
परवानगी नाकारल्यास रास्ता रोको
राखीव जनरेटर, सीसीटीव्ही कॅमेरे, दोन वॉच टॉवर, भरपूर प्रकाशव्यवस्था करावी. महापालिका स्वागत कक्षासह गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पालखी मार्गावरील नादुरूस्त दिवे, डीपी बॉक्स दुरुस्त करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून मंडप उभारण्यास मनाई केली जात आहे, असा आरोप करत सचिन काळभोर यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. पालखी आगमनावेळी शहरातील विविध संस्था, संघटनांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्यास पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी जकात नाका येथे महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात येईल.