विवाहितेला गर्भपातास भाग पाडले; सासरच्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:53 PM2021-11-10T17:53:30+5:302021-11-10T17:53:42+5:30
घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ केला
पिंपरी : घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ केला. तसेच गर्भपात करण्यास तिला भाग पाडले. सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे १० मार्च २०१९ ते २१ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेने मंगळवारी (दि. ९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रत्नदीप भगवान भालेराव (वय ३०, रा. पिंपळे गुरव), विशाल नारायण कांबळे (वय ३८, रा. दापोडी) आणि दोन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ केला. आरोपी रत्नदीप याने फिर्यादीवर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. विवाहितेच्या आई, वडील यांना मारून टाकण्याची धमकी दिली. कर्ज फेडण्यासाठी व घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. फिर्यादी सहा महिन्यांची गर्भवती असताना त्यांना पिंपरी येथील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तिथे पती आणि सासरकडील मंडळींनी त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडले.