धक्कादायक! गरम लोखंडी झाऱ्याने चटके देत तरुणीसोबत जबरदस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:03 IST2022-04-07T11:59:55+5:302022-04-07T12:03:11+5:30
चटके देत तरुणीवर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती

धक्कादायक! गरम लोखंडी झाऱ्याने चटके देत तरुणीसोबत जबरदस्ती
पिंपरी : दोन अनोळखी तरुणांनी एका तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केला. तसेच जाळून टाकण्याची धमकी देत तिला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोखंडी झाऱ्या गरम करून त्याचे चटके देत तरुणीवर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. हिंजवडी येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पिडीत १८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी गुरुवारी (दि. ७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मंगळवारी दुपारी घरी असताना आरोपी दोन तरुण तिच्या घरी आले. तुमच्या रूममधून पाण्याचा कॅन घ्यायचा आहे, असे म्हणून एका आरोपीने तरुणीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी तरुणीसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी स्टीलचा झाऱ्या आरोपीला फेकून मारला.
आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला घरात बोलावून घेतले. त्यानंतर तरुणीसोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. जाळून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली. पेटलेल्या सिगारेटने तरुणीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने झटका दिल्याने सिगारेट खाली पडली. त्यांनतर आरोपींनी झाऱ्या गॅसवर गरम केला आणि त्याने तरुणीच्या हातावर चटका दिला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.