तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 08:01 PM2018-07-17T20:01:17+5:302018-07-17T20:02:44+5:30
बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
तळेगाव : बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव पोलिसांनी तळेगाव दाभाडे - चाकण रोडवर स्वराज नगरी गेट समोर सोमवारी (दि. १६ जुलैै) केली.याप्रकरणी राहुल प्रमोद शर्मा (वय २५, रा. कुसगाव, ता. मावळे) आणि बालमुकुंद कमलेश चौरशीया (वय २१, रा. सलीहा, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन तळेगाव दाभाडे चाकण रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून स्कॉर्पिओ कार (एमएच ०४ / डी बी ७४४२) ताब्यात घेतली. कारमध्ये २ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. त्यावरून राहुल आणि बालमुकुंद यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नव्हता. त्यावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून एकूण ७ लाख ५६ हजारांंचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जी. एस माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी , विठ्ठल वेडेकर, प्रशांत वाबळे यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.