पिंपरी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना परदेशवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 08:02 PM2018-10-31T20:02:11+5:302018-10-31T20:25:53+5:30
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी संचालक आणि अधिकारी असे सात जणांना बार्सिलोना व स्पेन दौरा घडविला जाणार आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पदाधिकारी आणि अधिकारी परदेशवारीचे आयोजन केले आहे. स्मार्ट सिटी संचालक आणि अधिकारी असे सात जणांना बार्सिलोना व स्पेन दौरा घडविला जाणार आहे. त्यासाठी सुमारे २० लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
स्पेनमधील बार्सिलोना येथे १३ ते १५ नोव्हेंबरला स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१८ चे आयोजन केले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत. याबाबत एसएएआरसी अर्थात स्मार्ट सिटी वल्ड काँग्रेस या संस्थेकडून महापालिकेला निमंत्रित करण्यात आले आहे. महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, मनसे गटनेते सचिन चिखले, संचालक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील आदी सहभागी होणार आहेत.
२० लाखांच्या खर्चास मान्यता
सन्माननीय सदस्यांच्या दौऱ्यासाठी असणाऱ्या रकमेतून हा खर्च केला जाणार आहे. या दौऱ्यासाठी १४ लाख ४३ हजार ७५० रुपये नगरसचिव विभागाकडील लेखाशीर्षावरील रक्कम, तसेच स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी होणारा ५ लाख ७७ हजार हा माहिती तंत्रज्ञान विभागाकडील तरतूद अशा एकूण २० लाख २१ हजारांच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे.
——————
स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र निधी आहे. त्यामुळे अशा दौºयांचे खर्च स्मार्ट सिटीतूनच करायला हवेत. महापालिकेच्या इतर लेखाशीर्षातून करणे अयोग्य आहे.