परदेशी..परदेशी जाना नही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ नव्या स्ट्रेनचा प्रवाशांनी घेतला धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 12:58 PM2021-01-07T12:58:41+5:302021-01-07T14:43:15+5:30
पासपोर्टच्या अर्जांचे प्रमाण निम्म्याने घटले
नारायण बडगुजर-
पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट व त्यापाठोपाठ ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनमुळे जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. भारतीयांनी देखील त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे परदेशात जाण्याचे टाळले जात आहे. परिणामी नवीन पारपत्र अर्थात पासपोर्ट घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पडताळणी विभागाकडून गेल्या वर्षी ३२,६६४ तर २०१९ मध्ये ६७,५३० पासपोर्ट अर्जांची पडताळणी करण्यात आली.
परदेशवारी करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा भारतात शिरकाव झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्यावर्षी मार्चपासून लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर पासपोर्टसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली. उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो नागरिक दरवर्षी परदेशवारी करतात. तसेच लाखो नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करतात. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर त्यात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑग़स्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाल्यानंतर विशेष शाखेअंतर्गत पडताळणी विभागाचे कामकाज सुरू झाले.
पासपोर्टसाठीची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी नागरिकांकडून अर्ज करण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सर्वाधिक ६९३७ पासपोर्ट अर्ज होते. लाॅकडाऊन दरम्यान एप्रिलमध्ये केवळ एक तसेच मेमध्ये २३ तर अनलाॅक झाल्यानंतर त्यात वाढ होत असून, डिसेंमध्ये ३९१३ अर्ज प्राप्त झाले होते.
ब्रिटनमधील लाॅकडाऊनमुळे चिंता
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये लाॅकडाऊन केला आहे. तसेच ब्रिटन येथून भारतात परतलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आला. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, परदेशात जाण्याच्या तयारीतील भारतीय सतर्क झाले आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच विमान प्रवास करायचा तसेच कोरोनाचा धोका नसलेल्या देशांतच जाण्याला पसंती दिली जात आहे.
------------------------
पासपोर्ट अर्ज पडताळणी (२०२०)
जानेवारी ६९३४
फेब्रुवारी ५८२७
मार्च ३७५५
एप्रिल १
मे २३
जून ९८४
जुलै १२८२
ऑगस्ट १९१४
सप्टेंबर २६२७
आक्टोबर २९०१
नोव्हेंबर २५०३
डिसेंबर ३९१३
एकूण ३२६६४
---------------------------
वर्ष अर्ज
२०१८ - १९१४२
२०१९ - ६७५३०
२०२० - ३२६६४