रामचंद्र भालचंद्र यांच्या कार्याचा विसर
By admin | Published: June 10, 2017 02:08 AM2017-06-10T02:08:05+5:302017-06-10T02:08:05+5:30
अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस शनिवारी (दि. १०) साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. नेत्रदानाबाबत जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी, अशी अपेक्षा या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.
शासकीय सेवेत नेत्रचिकिस्तक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जून १९२४ रोजी झाला.कौटुंबिक परिस्थिती खडतर असतानाही जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी ऐंशी हजारांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या. अंधाचे आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत दहा जूनलाच (१९७९) मावळली. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधत हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून साजरा होतो.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रसंकलनासाठी सुमारे २५० हून अधिक नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. सन २०१६- २०१७ या वर्षात राज्यात ६२९७ नेत्रसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण व या पच्छात होणारे नेत्रदान यामध्ये मोठी तफावत आहे. नेत्रदान जनजागृती बाबत विविध शासकीय व अशासकीय संस्था कार्यरत आहेत. यांच्या मार्फत जनजागृती केली जाते. मात्र, याबाबतीत अजूनही म्हणावी तेवढी प्रगती झाली नसल्याचे मत या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
अंधत्व निवारणासाठी अनेक जण पुढे येत आहेत़ यातील तांत्रिक अडचणी दूर करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी प्रचार आणि प्रसार होणे महत्त्वाचे आहे. शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयातून याबाबत योग्य प्रकारे जनजागृती झाल्यास ही चळवळ अधिक जोमात होऊ शकते.