पोलिसांच्या सायबर सेलला कृष्ण प्रकाश यांचा विसर; आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांची डिजिटल सिग्नेचर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:40 AM2021-01-09T07:40:59+5:302021-01-09T07:45:02+5:30
पोलीस स्मार्ट, वेबसाईटचे काय : ऑनलाईन तक्रारकर्त्यांचा होतोय गोंधळ
पिंपरी : शहर पोलीस दलाला ‘स्मार्ट’ करण्याचा विडा उचललेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आयुक्तालयाच्या सायबर सेलला विसर पडलेला आहे. इ-तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना अद्यापही तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याच डिजिटल सिग्नेचरचे पत्र दिले जात आहे. त्यामुळे नेमके आयुक्त कोण आहेत, पोलीस स्मार्ट होताहेत मात्र आयुक्तालयाच्या वेबसाईटचे काय, असा सवाल ऑनलाईन तक्रारकर्त्यांकडून केला जात आहे.
तत्कालीन आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ कार्यान्वित झाले. या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या तक्रारी संकेतस्थळावरून नोंदविण्यास सुरवात केली. नोंदविलेल्या तक्रारीची पीडीएफ फाईल संबंधित तक्रारदारांना उपलब्ध करून दिली जाते. त्यावर पोलीस आयुक्तांचे नाव तसेच डिजिटल सिग्नेचर असते. बिष्णोई यांच्या कार्यकाळात ही सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचे नाव सिग्नेचर देण्यात येते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बिष्णोई यांची बदली झाली. कृष्ण प्रकाश यांनी ५ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर सेल कार्यान्वित आहे. या सेलकडून आयुक्तालयाचे संकेतस्थळ अद्ययावत केले जाते. आयुक्तांची बदली झाल्यानंतर त्यांची डिजिटल सिग्नेचर बदलणे आवश्यक आहे. मात्र तसे न झाल्याने अद्यापही संदीप बिष्णोई यांची डिजिटल सिग्नेचर असलेले कागदपत्र संकेतस्थळावरून उपलब्ध होत आहेत.
तांत्रिकबाबींमुळे नागरिकांना नाहक त्रास
तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयीन कामकाजासाठी तक्रारीसंबंधित कागदपत्रे सादर केली जातात. त्यावर सध्या कार्यरत आयुक्तांची डिजिटल सिग्नेचर नसल्याने गोंधळाची शक्यता आहे. या तांत्रिक बाबीमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची डिजिटल सिग्नेचर वापरणे ही बाब माहिती अधिकार कायद्यानुसार चुकीचे व गैर जबाबदारीचे लक्षण आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सायबर सेल असतानाही असे प्रकार व्हावेत हे गंभीर आहे.
- डाॅ. अभिषेक हरिदास, कार्यालयीन अधीक्षक, हमारा विश्व फाऊंडेशन